मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन नितीन देसाई यांनी आयुष्याची अखेर केली. हिंदी चित्रपटांसह अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी त्यांनी आयुष्याची अखेर केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देसाईंच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे. अनेक मराठी-हिंदी इतिहासकालीन चित्रपट आणि मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शनाचं काम करुन, प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यांची कामातील प्रचंड प्रतिभा अनेक नव्या प्रकल्पांना घडवत होती. त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं आहे, त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
आदेश बांदेकरांना बसला मोठा धक्का
आपल्या जवळच्या मित्राने इतकं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी एकदा तरी बोलायला हवं होतं अशी प्रतिक्रिया अभिनेते आदेश बांदेकर यांनी दिली. एक खूप मोठा धक्का आमच्यासाठी आहे. त्याने एक मोठं स्वप्न पाहिलं आणि त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी तो किती झपाटलेला होता हे आम्ही कायमच पाहिलं. आपलं काम करत असतानाच त्यांनी महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं; यात त्याचा खूप मोठा वाटा आहे. जे नितीनला ओळखतात त्यांना माहीत आहे की तो साऱ्यांचाच मित्र होता. सगळ्यांशी बोलणं, संवाद साधणं कायम असायचं. याचमुळे जेव्हा मला हे कळलं तेव्हा मला फार वाईट वाटलं. त्याने बोलायला पाहिजे होतं.तो अनेकदा सहज फोन करायचा.कधी आला तर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आला तर भेटायचा. ‘त्याला अनेक वर्षांपासून मी ओळखतो त्यामुळेच त्याने का असं केलं हा प्रश्नच पडला आहे.आम्ही दोघंही पवईतच राहत होतो. कधी तरी तो फोन करून बोलायचा की चल भेटूया.. पण इतर गोष्टींवरच आम्ही अधिक बोलायचो. त्याच्या मनात नक्की काय चाललं आहे हे कधीच कळलं नाही. त्याने कधी जाणवूच दिलं नाही की तो कोणत्या तणावात आहे. जे झालं ते फार ‘
फोन करायला हवा होता…-महेश मांजरेकर
ही बातमी खूपच वाईट आहे. म्हणजे मराठी इंडस्ट्रीचा अभिमान होते नितीन चंद्रकांत देसाई. ते कला दिग्दर्शक असण्यापेक्षा माझे खूप जवळचे मित्र होते. खूपच वाईट आहे हे, मला काही कळत नाहीये. माणसाच्या डोक्यात कधी काय चालू असतं कळत नाही. नंतर वाटतं की आपण बोलायला पाहिजे होतं. आपण हल्ली बोलत नाही, मित्र म्हणून कधी फोन करत नाही. हे खूप गरजेचं आहे असं मला वाटायला लागलं आहे. माझा पिता नावाचा सिनेमा होता, त्याचे सेट त्याने केले होते. आर्ट डिरेक्टर म्हणून तो ग्रेट होताच, त्यात काही वादच नाही.’
‘मनोरंजन विश्वाचे हे खूप मोठे नुकसान झाले आहे. मला असं वाटतंय की आपण बोलत नाही, आपण मित्र असतो पण अशावेळी लक्षात येतं की आपण बोलायला हवं होतं.’ ‘अगदी दोन-तीन महिन्यापूर्वीच आमचं बोलणं झालेलं. तो बोलला ही काहीतरी नवीन करू, पण असं काय करेल हे कळतंही नाही. मी त्याला पाहिलेलं तेव्हा तो काहीसा भावुक झाला होता, का ते मला कळलं नव्हतं. दिवसेंदिवस तो शांत झाला होता. आपण त्याला आधी पाहिलं होतं त्यापेक्षा तो वेगळा व्यक्ती बनत चालला होता.’ मात्र शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्यांना कोणता त्रास होतोय, असं काही जाणवलं नसल्याचं मांजरेकर म्हणाले..