परभणीमुख्य बातमी

शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातून जाणार

परभणी : राज्यातील १३ जिल्ह्यांना जोडणारा अन ८६ हजार कोटी रुपये खर्चाचा नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यातून व मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातून जाणार आहे. या द्रुतगती महामार्गाच्या व्यवहार्य अभ्यास अहवाल, सविस्तर प्रकल्प अहवाल, भूसंपादन सहाय्याकरीता सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामाचा येत्या १८ महिन्यात सविस्तर प्रकल्प अहवाल उपलब्ध होईल, असा विश्‍वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

विधीमंडळाच्या या पावसाळी अधिवेशनाच्या अंतीम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनी एका लक्षवेधीद्वारे नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. शासन स्तरावरील प्रक्रिया व प्रगती संदर्भातही तपशील जाहीर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी या शक्तीपीठ महामार्गा संदर्भात विधान परिषदेत सविस्तर माहिती सादर केली.

राज्यातील पवनार (जि. वर्धा) ते पात्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) बांधकाम हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर सर्व धार्मिक स्थळांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने व्हावे असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास या प्रकल्पाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत, असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडणे प्रस्तावित आहे, असे नमूद केले.

द्रुतगती महामागार्मुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर व कोल्हापूर, आंबाजोगाई ही तिर्थक्षेत्र हे जोडली जाणार असून संताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी आंबाजोगाई स्थित मुकूंदराज स्वामी, औंढानागनाथ व परळी वैद्यनाथ येथील १२ ज्योर्तिलिंगे यापैकी दोन ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई मंदीर हे जोडली जाणार आहेत. तसेच कारंजा (लाड), माहुर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औंदुबर ही दत्त गुरुंची धार्मिक स्थळेही जोडली जातील.

महामागार्मुळे नागपूर ते गोवा हा प्रवास सद्य:स्थितीत २१ तासांचा प्रवास साधारणत: ११ तासावर येईल. दळणवळण गतीमान झाल्याने परिसराचा नियोजनपूर्वक वेगाने विकास होईल. प्रस्तावित महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाची लांबी भूसंपादनासह अपेक्षित खर्च रु.८६,३०० कोटी एवढा आहे, असे स्पष्ट केले.

७६० कि.मी. चा महामार्ग ढोबळमानाने प्रकल्पाचे काम ३ वर्षांच्या कालावधीत पुर्ण करणे शक्य आहे. त्यासाठी साधारणत: ८२५० हेक्टर जमीन संपादित करावी लागेल, असे म्हटले. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व भूसंपादनासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व यंत्रसामुग्री संबंधित विभागास उपलब्ध करण्यासाठी सर्वसाधारणत: रु.५८.५० कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे, असेही म्हटले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button