तोंडचा घास पळवल्यानंतरही विटेकर जानकरांसोबत,प्रेसलाआ..गुट्टे, लहाने देशमुख फड भरोसे एकत्र
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
परभणी/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कोट्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली असून या संधीचे सोने करून कित्येक वर्षापासून अतिमागास राहिलेल्या परभणी जिल्ह्याचा विकास करणार असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर आज रविवारी (दि.३१) परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जानकर हे सोमवारी (दि.१) मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, शिवसेना लोकसभा समन्वयक माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी आमदार मोहन फड, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, राजेश विटेकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवटे,भाजपचे महामार अध्यक्ष संतोष देशमुख, गफार मास्टर, शिवसेना महानगर अध्यक्ष प्रवीण देशमुख, सुरेश भुमरे रिपाई चे दाभाडे, गंगाधर आवरगंड आदी उपस्थित होते. श्री.जानकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दत्तक मला घेतले आहे, त्यामुळे माझ्याकडे उपरा म्हणून कुणी बहकवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याकडे लक्ष देवू नये. परभणीत एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नाही, समृध्दी महामार्ग परभणी जिल्हयातून का जात नाही, जिल्हयाचा मूलभूत विकास का झाला नाही? असे अनेक प्रश्न असून ते सोडविण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आपण ही निवडणूक लढवत आहोत, असा दावा जानकर यांनी केला. बारामती, रायबरेली, गांधीनगर, वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत शरद पवार, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाच्या धर्तीवर परभणीचा कायापालट करू, असेही ते म्हणाले.
प्रताप देशमुख यांनी सांगितले की, परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून जानकर यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केलेली असून जानकर यांना निवडून आणण्यासाठी महायुतीच्या वतीने सर्व घटक पक्ष १०० टक्के काम करणार आहेत. राजेश विटेकर यांनी आपण गेल्या ५ महिन्यापासून संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी करीत होतो, मात्र पक्षाच्या आदेशानुसार आता जानकर यांचे एकदिलाने काम करणार असून कुणाच्याही मनात किंतू- परंतु अथवा गैरसमज नाहीत, असे सांगितले. इतर नेते व पदाधिकारी यांनी महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले.