जानकर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार.
महायुतीद्वारे उमेदवारी निश्चित झाल्याचा दावा.
परभणी,
हनुमंत चिटणीस
परभणी लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार रामप्रसाद बोर्डीकर आणि राजेश विटेकर यांच्या तोंडचा घास पळवला गेला आहे. महायुतीकडून आता महादेव जानकर हे निवडणूक लढविणार असल्याची माहिती हाती आली आहे… सोबतच वर्षानुवर्ष असलेला धनुष्यबाण आता दिसणार नाही घड्याळही दिसणार नाही.
: परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवू इच्छिणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची आज शनिवारी रोजी दूपारी मुंबईतून माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सोमवार रोजी आपण परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती मार्फत अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत अशी माहिती दिली.
आपणास परभणीतून निवडणूक लढवावी असे महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी सुचित केले आहे. त्याप्रमाणे आपण सोमवारी परभणीतून महायूतीमार्फत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य मंत्री व वरिष्ठ नेते मंडळी आपल्या समावेत सहभागी असणार आहेत अशी ही माहिती जानकर यांनी दिली.
दरम्यान महाविकास आघाडीतून परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हिश्श्यास बहाल करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील, हे स्पष्ट होते. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटेकर यांना कामास लागण्याचा आदेशही दिला होता. त्या प्रमाणे विटेकर हे गेल्या महिन्याभरापासून मोर्चेबांधणीस जूंपले होते. अलीकडेपर्यंत ते गाठीभेटीत दंगही होते. परंतु, गेल्या तीन चार दिवसात मुंबईतील एका पाठोपाठ एक विलक्षण अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विटेकर यांच्याच उमेदवारीवर गंडांतर कोसळले. त्याचे कारण, जानकर हे ठरले. महायुतीतून आपणास परभणीची जागा सोडावी, अन्यथा आपण महाविकास आघाडीकडून म्हाढा येथून निवडणूक लढवू, असा इशारा दिल्यानंतर महायुतीच्या श्रेष्ठींनी जानकर यांना पाचारण करीत पुन्हा चर्चेचे गुर्हाळ सुरु केले. त्यातून परभणीची जागा रासपला बहाल करण्याचा निर्णयसुध्दा घेतला. खुद्द जानकर यांनीच आपल्या फेसबुक पेजवरुन या संदर्भात माहिती दिली. नव्हे, कै. गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी श्रीमती प्रज्ञा मुंडे यांची भेट घेवून, त्यांचे आशिर्वाद घेतानांची छायाचित्रेसुध्दा अपलोड केले. त्यामुळे ते परभणीत दाखल होतील, असे अपेक्षित होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून महायुतीच्या श्रेष्ठींनी संयुक्त पत्रकार परिषद, त्यातून उर्वरीत जागांवरील उमेदवारी यादी जाहीर करण्या संदर्भात टाळाटाळ केली. त्यामुळेच शुक्रवारी सायंकाळपर्यंत जानकर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही. जानकर हे मुंबईत अधिकृत उमेदवारी जाहीर होईल, या प्रतिक्षेत ठाण मांडून होते, परंतु पक्षसृष्टीने शनिवारी सकाळी जानकर यांना परभणी गाठून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्यानंतर जानकर यांनी लगेच हालचाली सुरू केल्या,तत्पूर्वी मुंबईतून माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आपली परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून नाव निश्चित झाले आहे हे आवर्जून स्पष्ट केली.