तरुणाची ‘इस्त्रो’मध्ये निवड, पण मुंबईकडे येताना कागदपत्रांची बॅग चोरीला; नंतर चमत्कारच घडला…
नाशिक : एसटीच्या चालक, वाहकांना खिडकीच्या काचा बंद करताना एक बेवारस बॅग आढळते. कुणी प्रवासी ही बॅग विसरलेला असतो. बॅगेतील कागदपत्रांवरून दोन मोबाइल नंबर मिळतात. दुर्दैवाने फोनचा रिचार्ज संपल्याने तेही बंद येतात. चालक-वाहक स्वत: पदरमोड करून त्या मोबाइल क्रमांकांवर रीचार्ज मारतात. त्यावर संपर्क साधून सापडलेल्या बॅगची माहिती देतात अन् त्यानंतर ही बॅग संबंधिताकडे सुपूर्द केली जाते. एसटीची विश्वासार्हता वाढविणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे भारावलेल्या विभाग नियंत्रकांनी त्यांची पाठ थोपटली.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इगतपुरी आगाराचे वाहक गोरख हिरामण शिंदे आणि चालक प्रकाश रामदास खाडे धुळे-कसारा बसद्वारे प्रवासी वाहतूक करतात. सर्व प्रवासी उतरल्यानंतर बसच्या खिडक्या बंद करीत असताना त्यांना बसमध्ये बॅग सापडली. या बॅगमध्ये विद्यार्थ्याची गुणपत्रके व प्रमाणपत्रे होती. ही बॅग बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील राजरत्न प्रभाकर कोकाटे यांची असल्याचे स्पष्ट झाले. बॅगेतील कागदावरील दोन मोबाइल क्रमांकांवर त्यांनी संपर्क साधला. परंतु, रीचार्जअभावी दोन्ही क्रमांक बंद होते. शिंदे आणि खाडे यांनी स्वत:च्या पैशांनी हे मोबाइल रिचार्ज केले. त्यानंतर फोन लागला. एका तरुणाने फोन उचलला. बॅग माझीच असून, नाशिक-इगतपुरी रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेल्याचे त्याने सांगितले. या बॅगमध्ये चालक-वाहकांना १४ हजार रुपये आणि संबंधित विद्यार्थ्याची दहावीपासून पदवीपर्यंतची प्रमाणपत्रे, गुणपत्रके मिळून आली. कागदपत्रे आणि पैसे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर ती बॅग ताब्यात घेण्यासाठी त्या तरुणाने थेट धुळे गाठले.
दरम्यान, याच इगतपुरी आगारातील वाहक मीना भाऊसाहेब आहेर यांनाही इगतपुरी-नाशिक प्रवासादरम्यान एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची मूळ कागदपत्रे व ८१५ रुपये असलेली बॅग सापडली होती. त्यांनीही ती संबंधित विद्यार्थिनीला परत केल्याने त्यांचाही विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘इस्त्रो’मध्ये झालेली आहे निवड
सध्या हिंगोली जिल्हा परिषदेत लिपिकपदावर कार्यरत हा मुलगा दिव्यांग आहे. ‘इस्त्रो’मध्ये निवड झाल्याने कागदपत्रे पडताळणीसाठी तो मुंबईला चालला होता. त्यावेळी प्रवासादरम्यान ही बॅग चोरीला गेल्याने त्याचे स्वप्नच धुळीला मिळाल्याची जाणीव झाली. गंमत म्हणजे बॅगच्या वरच्या कप्प्यातील १७०० रुपये काढून घेतल्यानंतर चोरट्याने ही बॅग संबंधित बसमध्ये टाकून दिल्याचा उलगडा झाला. शिंदे व खाडे यांनी ही बॅग संबंधित विद्यार्थ्याकडे सुपूर्द केली.