राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अद्यापही मान्सून लांबणीवर आहे. पण हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खरंतर, यंदाच्या हंगामातील मान्सून केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि गोव्यानंतर आता कोकणात दाखल झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळं कोकण तसेच मुंबईच्या किनाऱ्यावरही पाऊस झाला. अशात पुढील २४ तासांत मराठवाडा, मुंबई, कोकण, मध्य व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. यामुळे कोकणासह मुंबई आणि उपनगरांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. यानंतर आता पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर वातावरणही ढगाळ असल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
राज्यात एकीकडे आधी अवकाळी पावसाने थैमान घातलं नंतर चक्रीवादळाचा तडाखा पाहायला मिळाला. या सगळ्यात आता मान्सून लांबणीवर पडल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. राज्यात आणि देशात रखडलेला मान्सूनचा प्रवास २३ जूनपासून पुन्हा सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवला.
या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता…
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.