गंगाखेड : गंगाखेड बसस्थानकावरून दागीने चोरीस गेलेल्या महिलेस गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराच्या अपमानास्पद वागणूकीस सामोरे जावे लागले. आज दुपारी गंगाखेड पोलीस ठाण्यात हा संतापजनक प्रकार घडला. अरेरावी करणारे ठाणे अंमलदार शंकर रेंगे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे.
काल दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बुलडाणा- अहमदपूर या बसने गजराबाई पौळकर ( रा. शिरूर ताजबंद, ह. मु. पुणे ) या आपले पती आणि नातवासह अहमदपूरकडे जात होत्या. बस मध्ये चढत असताना एका बुरखाधारी महिलेने त्यांच्या गळ्यातील जवळपास दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागीने लंपास केले. ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. स्थानकावर पोलीस कर्मचारी नसल्याने त्यांनी वाहकास बस पोलीस ठाण्यात नेण्याची विनंतीही केली. परंतू यास वाहकाने नकार दिल्याने बस अहमदपूरकडे गेली. या धक्क्याने गोंधळलेल्या गजराबाई यांची तब्येत बीघडली.
आपल्या नातेवाईकाकडे चाकूर येथे गेल्यानंतर त्यांनी घडला प्रकार सांगीतला. या चोरीची फिर्याद देणे आवश्यक असल्याने आपल्या एका नातेवाईकासह आज दि. २८ रोजी त्यांनी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून आपली कैफीयत मांडली. परंतू ड्यूटीवर असलेल्या ठाणे अंमलदार शंकर रेंगे यांनी फिर्याद घेण्यास असमर्थता दाखवली. बाजार समितीची निवडणुक सुरू आहे. वरीष्ठ अधिकारी ठाण्यात हजर नाहीत, तुम्ही चार नंतर या, असे महिलेस बजावले. आमचा फक्त अर्ज घ्या आणि आपले वरीष्ठ आल्यानंतर कार्यवाही करा, अशी वारंवार विनंती करूनही रेंगे यांची नकारघंटा कायम होती. सदर महिलेस परत बाहेरगावी जायचे आहे, आपण पोलीस निराक्षकांना कॉल करून परवानगी घ्या अशी विनंती करूनही रेंगे यांनी वरीष्ठांना फोन करण्यास अथवा अर्ज घेण्यास स्पष्ट नकार दिला.
हा प्रकार समजल्यानंतर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांचेशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. पोलीस निरीक्षकांनी फिर्यादीचा अर्ज घेण्यास फर्मावल्यानंतर चीडलेल्या शंकर रेंगे यांनी फिर्यादी महिलेसच आरोपीची वागणूक दिली. सोबतच्या नातेवाईकासही अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे फिर्यादी महिलेची अवस्था ‘फिर्याद नको, पण हा प्रकार थांबवा’ अशी झाली होती. अखेर सदर चोरीचा अर्ज लीहून घेत फिर्यादी महिलेस ठाण्याबाहेर काढून देण्यात आले. या दरम्यान शंकर रेंगे यांच्या संतापाचा पारा प्रचंड वाढलेला होता.
सरकार महिला सक्षमीकरण, सबलीकरण, महिला सुरक्षेचा घोषणा करत असताना महिला पोलीस अधिक्षक असलेल्या जिल्ह्यात आणि महिलाच पोलीस निरीक्षक नियुक्त असलेल्या पोलीस ठाण्यातच शंकर रेंगे सारखे पोलीस कर्मचारी चोरीस बळी पडलेल्या महिलांना अशी वर्तणूक देत असतील तर दाद मागायची कुठे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भाने आपण पोलीस अधिक्षक आर रागसुधा यांची भेट घेणार असून माजोर ठाणे अंमलदार शंकर रेंगे यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी सांगितले आहे.