…तर राहुल नार्वेकरच १६ आमदारांना अपात्र ठरवतील, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल सुनावला आहे. शिंदे गटाचे १६ अपात्र आहेत किंवा नाहीत? यासंदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पण विधानसभा अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे असल्याने हा निर्णय शिंदे गटाच्याच बाजुने लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पण सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरच १६ आमदारांना अपात्र ठरवू शकतात, असं विधान सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेण्यासाठी वाजवी वेळ (Reasonable time) किती असावा, हे सर्वोच्च न्यायालयाने कुठेच नमूद केलं नाही. प्रत्येक राज्याच्या विधिमंडळाचे नियम वेगळे असतात. महाराष्ट्र विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे वेळेची काहीही मर्यादा नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयही या भानगडीत पडलं नाही. त्यांनी वाजवी वेळेत निर्णय द्या, असं सांगितलं आहे. मग तो वाजवी वेळ किती असावा, हे विधानसभा अध्यक्ष ठरवतील.”
पण १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना परिशिष्ट १० मधील नियमांचं पालन करा, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे परिशिष्ट दहा प्रमाणे निर्णय दिला तर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात आणि राहुल नार्वेकरच त्यांना अपात्र ठरवतील. कारण नार्वेकर जेव्हा अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसतात, तेव्हा ते निरपेक्ष असतात. त्यामुळे ते शिंदे गटाच्या बाजुने निर्णय देतील किंवा ठाकरे गटाच्या बाजुने निर्णय देतील, असं म्हणणं आता चुकीचं आहे. अध्यक्षांच्या निर्णयानंतर नाराज गट पुन्हा न्यायालयात जाऊ शकतो,” असंही त्यांनी नमूद केलं.