मागच्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँग सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. सदाशिव पेठ येथे एका महाविद्यालयीन तरूणीवर झालेल्या कोयता हल्ल्याने पुणे हादरले होते. त्यानंतर आता कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सुरा आणि कोयता घेऊन धमकावणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
कोयता आणि सुरा घेऊन विद्यार्थ्यांना धमकवणाऱ्या टोळीची कॉलेज मध्येच पोलिसांनी काढली धिंड, पुण्यातील गरवारे महाविद्यालयातील प्रकार#GarwareCollege #Crime #PunePolice #Video pic.twitter.com/N27C53kB56
— SakalMedia (@SakalMediaNews) July 6, 2023
अधिक माहितीनुसार, पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कोयता आणि सुरा घेऊन विद्यार्थ्यांना धमकवणाऱ्या टोळीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून त्यांची कॉलेज मध्येच धिंड काढण्यात आली आहे. या गुंडांमध्ये ९ जणांचा सामावेश असून त्यामधील २ जण हे याच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांना धमकावणे तसेच त्यांच्याकडून पैश्याची मागणी करणे असे कृत्य ही टोळी काही दिवसांपासून करत होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली त्यांना अटक करण्यात आली आहे. कॉलेजमध्येच त्यांची वरात काढून दहशत माजवणाऱ्यांना धडा शिकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
दरम्यान, सदाशिव पेठ येथे तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.