परभणी : शहरातील कारेगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक अपघात घडले असून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम तातडीने करण्याच्या मागणीसाठी व रस्ता दुरावस्थेच्या निषेधार्थ मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात मा.नगरसेवक विशाल बुधवंत यांनी शुक्रवार, दि.०७ जुलै रोजी देशमुख कॉर्नर येथे सरण रचून त्यावर झोपून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच नवा मोंढा पोलिसांसह मनपा अधिकारी, कर्मचा-यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. या वेळी संतप्त बुधवंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात उपस्थित अधिका-यांना माहिती देत जोरदार घोषणाबाजी केली.
शहरातील कारेगाव रस्ता भयावह अवस्थेत आहे. एमआयडीसीपासून उघडा महादेव ते देशमुख कॉर्नर तेथून पुढे सुपरमार्केट मार्गे देशमुख गल्ली पर्यंतच्या या रस्त्यावर शेकडो अपघात घडले असून त्यातून अनेक जायबंदी झाले आहेत. या रस्त्यावरील अपघातात काहींचे बळी गेले आहेत. त्यामुळे बुधवंत यांनी या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम संबंधित यंत्रणेने तातडीने सुरु करावे अशी मागणी केली. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात शुक्रवारी दुपारी देशमुख कॉर्नर रस्त्यावरील चौकात सरण रचून त्यावर झोपून अनोखे आंदोलन करीत संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळेस संतप्त कार्यकर्त्यांनी बुधवंत यांच्या समर्थनार्थ व महापालिकेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत आपला रोष व्यक्त केला. बुधवंत यांच्या या अनोख्या आंदोलनाचे वृत्त कळाल्याबरोबर नवामोंढा पोलिसांनी धाव घेतली. महापालिकेच्या अधिका-यांना या संदर्भात कल्पना दिली. मनपाचेही अधिकारी-कर्मचारी या ठिकाणी धावून आले. तेव्हा बुधवंत यांच्यासह अन्य संतप्त कार्यकर्त्यांनी या भयावह रस्त्याच्या अवस्थेसंदर्भात कल्पना दिली.
मा.नगरसेवक बुधवंत यांच्या आंदोलनामुळे मनपा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसह परीसरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते. या आंदोलनाची चर्चा दिवसभर शहरात होती. या आगळ्या वेगळ्या आंदोलनानंतर तरी संबंधीत यंत्रणेला जाग येवून या रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा नागरीकातून व्यक्त होत आहे.