शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM मोदींची घोषणा, खात्यात १४ वा हफ्ता जमा, १७ हजार कोटी ट्रान्सफर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सम्मान निधीची योजनेचा १४वा हप्ता जारी केला आहे. राजस्थान दौऱ्यावर सीकर येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केले. शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या हक्काचे पैसे जारी करताना पंतप्रधान म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. त्यांनी म्हटले की, १४व्या हप्त्यापर्यंत २ लाख ६० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
थेट (डायरेक्ट) लाभ हस्तांतरणाद्वारे दोन हजार रुपयांचा १४वा हप्ता थेट देशातील ८.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या १४व्या हप्त्याद्वारे १७ हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे. दरम्यान तुमच्या खात्यात १४ वा हप्ता जमा झाला की नाही ते तपासा…
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला संदेश तपासा
योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हस्तांतरित केल्याचा संदेश आला असेल. खात्यात दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज फक्त बँकेकडून नाही तर सरकारकडून १४वा हप्ता जाहीर झाल्याचा संदेशही तुमच्या मोबाईलवर आला असता.
मिनी स्टेटमेंट किंवा खाते शिल्लक तपासा
जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हप्त्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही काही काळ वाट पाहू शकता. त्यानंतरही मेसेज आला नाही, तर तुम्ही एटीएममध्ये जाऊन तुमचे मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा खात्यातील शिल्लक तपासू शकता. याशिवाय, पासबुकमध्ये एंट्री करून तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी १.२५ लाख किसान समृद्धी केंद्रे समर्पित केली जात आहेत. याद्वारे शेतीशी संबंधित प्रत्येक माहिती, प्रत्येक योजनेची माहिती, त्याचे फायदे आदी माहिती दिली जाणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे, जी थेट त्यांच्या खात्यात जमा झाली.