बुधवारी गोरेगाव पूर्व परिसरातून व्यापारी राजकुमार सिंह यांचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बंदुकीच्या धाकावर व्यापाऱ्याचे अपहरण केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कार्यालयात सुमारे १० ते १५ जण घुसले. म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांचे अपहरण केल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचे एक सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये १० ते १५ जण कर्मचार्यांना शिवीगाळ करत असल्याचं बोललं जातं. तर एका व्यक्तीला जबरदस्तीने सोबत नेतानाही दिसत आहे.
तक्रारदार राजकुमार सिंग यांच्या आरोपानुसार, त्यांना त्यांच्या कार्यालयातून जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं. पाटणा येथील मनोज मिश्रा यांना दिलेल्या व्यावसायिक कर्जाची सेटलमेंट करण्यासाठी त्यांच्यावर बंदुकीच्या जोरावर दबाव आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. “राजकुमार यांना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर येथील कार्यालयात नेण्यात आले, तिथे आमदारपुत्र राज सुर्वे आणि त्यांच्या साथीदारांनी सिंग यांना बंदुकीच्या जोरावर हे प्रकरण मिटवण्याची आणि त्याबद्दल कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देण्यात आली” असं वृत्त एएनआयने एफआयआरच्या हवाल्याने दिले आहे.