आ.वरपुडकर सुप्रीम कोर्टात जिंकले……!!
वरपुडकरांविरुध्दच्या कारवाईस सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थगिती
जिल्हा मध्यवर्ती बँक : सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय
परभणी : हनुमंत चिटणीस
दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष सुरेश अंबादासराव वरपुडकर यांचे विभागीय सहनिबंधकांनी वरपुड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जिल्हा बँकेची थकबाकीदार असल्याच्या कारणाने बँकेचे संचालकत्व अपात्र ठरविण्याबाबत दिलेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती बहाल केली आहे.
दरम्यान, विभागीय सहनिबंधक जनार्दन गट्टे यांनी 20 ऑक्टोंबर 2023 रोजी या संदर्भातील आदेश पारित करीत तो जिल्हा बँकेस पाठविल्याने या जिल्ह्यातील राजकीय व सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने त्या आदेशास स्थगिती दिल्याने वरपुडकर गटास मोठा दिलासा मिळाला आहे.
वरपुडकर हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष आहेत. 25 सप्टेंबर 2022 रोजी वरपुड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. या संस्थेचे वरपुडकर यांनी संचालकत्व धारण केले. त्याच दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर 2022 रोजी वरपुड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही जिल्हा बँकेची कसूरदार/थकबाकीदार होती. या संदर्भातच आक्षेप दाखल झाल्यानंतर वरपुडकर यांच्यावतीने विभागीय सहनिबंधकांकडे कागदपत्रे सादर करण्यात आली. तसेच युक्तीवादही करण्यात आला. परंतु, विभागीय सहनिबंधक जनार्दन गुट्टे यांनी वरपुडकर व संस्थेने दिलेल्या खुलाशासह सादर केलेली कागदपत्रे व युक्तीवाद समाधानकारक नाही, असे स्पष्ट करीत विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी महाराष्ट्र संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कअ (1)(फ) आणि (2) नुसार दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी बँकेचे संचालक म्हणून अपात्र ठरविले होते. त्यांचे संचालक मंडळ सदस्यत्वही बंद करणे योग्य असल्याची आपली खात्री झाल्याचे म्हटले होते. या निर्णया विरोधात वरपुडकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी उच्च न्यायालयाने यापूर्वी या निर्णयास दिलेल्या स्थगितीचा आदेश निदर्शणास आणून दिला.