छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी अंतरवाली ते मुंबई या पायी प्रवासाची तयारी करावी’, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मुंबईला जाण्याचा मार्ग आणि आंदोलनाच्या तयारीबाबत लवकरच माहिती जाहीर केली जाणार आहे, असेही जरांगे म्हणाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज जरांगे पाटील तीन दिवस छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पूर्वतयारीची माहिती जरांगे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ‘राज्यात आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहेत. २० जानेवारीला मुंबईत जाण्याची तयारी करायची असल्यामुळे लोक विचारणा करीत आहेत. अंतरवाली येथील साखळी उपोषण कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. तर राज्यातील साखळी उपोषण स्थगित करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. लोकांचा आग्रह असल्यामुळे गाठीभेटी घेण्यासाठी राज्यात सहावा दौरा सुरू करण्याचे नियोजन आहे. अंतरवाली ते मुंबई मार्ग निश्चित केला जात आहे. रस्ता आणि प्रवासाचे टप्पे स्वयंसेवकांना सांगितले जाणार आहेत. मुंबईचे आंदोलन मोठे असल्यामुळे कुणीही घरी राहू नये. मुलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व कामे उरकून मुंबईकडे निघायचे आहे. या प्रकारचे सर्वात मोठे शांततापूर्ण आंदोलन देशात आतापर्यंत कधी झाले नसेल, असे जरांगे म्हणाले.
- मुंबईत आमरण उपोषण अनेक दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोबत घ्यायच्या वस्तू आणि इतर माहिती दिली जाणार आहे.
- सोबत आणलेले ट्रॅक्टर किंवा ट्रक या वाहनांना छत लावायचे आहे. आपल्याच वाहनात मुक्काम करुन आंदोलन यशस्वी करायचे आहे.
- हे आंदोलन शेवटचे राहणार असून येताना आरक्षण घेऊनच यायचे आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली. परीक्षा आणि नोकर भरती जवळ आली आहे.
- एकदा संधी हुकून गेल्यानंतर आंदोलन करून उपयोग नसतो. त्यामुळे सर्वांनी आंदोलनासाठी मुंबईत यायचे आहे.