शिवाजीनगर तांडा येथील गुणवंत गौरव समारंभात चिमुकले भारावले
जिजाऊ, विवेकानंद जयंती निमित्त उपक्रम
गंगाखेड : येथून जवळच असलेल्या शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आज गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मिळालेली पारितोषिके आणि सत्कारामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकही भारावल्याचे चित्र याप्रसंगी दिसून आले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने हा उपक्रम घेण्यात आला.
कॉंग्रेस तालुकाध्यक्ष तथा साई सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव, सचिव नागेश पैठणकर, माजी नगरसेविका सौ. वर्षा यादव यांची या प्रसंगी प्रमुख ऊपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक शिवराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तालुका, जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थीनी तसेच गंगाखेडच्या दसरा महोत्सवात आपली कला सादर केलेल्या विद्यार्थीनींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. तर माझी डिक्शनरी स्पर्धेचा निकाल घोषीत करून बक्षीस वितरण करण्यात आले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थीनी व पालकांनाही गौरवांकीत होताना आपले आनंदाश्रू अनावर झाल्याचे बघावयास मिळाले. गोविंद यादव, सौ. वर्षा यादव, प्रथम यादव यांची समायोचीत भाषणे झाली. जिप शाळेतील ऊपक्रमशील शिक्षिका सौ. ईदूमती कदम व त्यांच्या सहकार्यांचे सर्वांनीच कौतूक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. ईंदूमती कदम, प्रास्ताविक श्रीमती शैला शिरसाट, ऊषा गडमे यांनी तर आभार प्रदर्शन रिहाना अतार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपात विद्यार्थीनींसह पालक व प्रमुख पाहुण्यांनीही पारंपरिक नृत्यात सहभागी होत आनंदोत्सव साजरा केला.