मराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमी

मराठवाड्याच्या लेकीचा विदेशात डंका; अमेरिकेत मिळवलं दीड करोड रुपयांचं पॅकेज

छत्रपती संभाजीनगर : स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर ते स्वप्न नक्की पूर्ण करता येतात. या शब्दांना सत्यात उतरवलं ते मराठवाड्याची लेक शुभदा पैठणकरने. सामान्य कुटुंबातील शुभदाने मराठी माध्यमातून शिक्षण घेत, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथील विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. त्यानंतर नामांकित कंपनीत नोकरीही मिळवली. या कंपनीत तिला तब्बल दीड करोड रुपयांचे पॅकेज मिळालं आहे. तिच्या प्रवासामुळे मराठवाड्यातील सामान्य कुटुंबातील मुलामुलींना परिस्थितीवर मात करत स्वप्नांची दार कशी उघडायची हे तिने दाखवून दिलं. यामुळे मराठवाड्याच्या लेकीची सर्वस्तरातून कौतुक होतंय.

मूळची जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शुभदा संजय पैठणकर असं अमेरिकेत शिक्षण घेऊन त्या ठिकाणी नोकरी मिळवलेल्या मराठवाड्यातील लेकीचं नाव आहे. शुभदाचे आई वडील दोघेही पेशाने शिक्षक आहेत. तिला एक भाऊ एक बहीण आहे. भोकरदन येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण करत माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूलमध्ये पूर्ण केलं. शालेय शिक्षण घेत असताना शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा वक्तृत्व स्पर्धा किंवा खेळाचे मैदान या सर्व क्षेत्रांमध्ये तिने आपला ठसा उमटवला आहे. शुभदाने भविष्यात डॉक्टर व्हावं अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती. मात्र, तिला इंजेक्शन आणि ब्लड बघून भीती वाटत असल्याने तिला डॉक्टर होऊन रुग्णांना न्याय देऊ शकणार नाही हे माहीत होतं. ती आठवीत असताना तिच्या वडिलांनी घरी कॉम्प्यूटर घेतलं. कॉम्प्यूटर घरी आणल्यानंतर त्याबद्दल तिला उत्सुकता निर्माण झाली. इंटरनेटचा वापर करून तिने त्याबद्दल माहिती घेतली असता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग संदर्भात तिला माहिती मिळाली आणि तेव्हा तिने त्यामध्ये करिअर करायचं ठरवलं.

दहावी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये तिने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शहरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी केली. पगार देखील समाधानकारक होता. मात्र, आपल्यामध्ये असलेल्या कौशल्याचा वापर करून आपण यापेक्षा चांगली नोकरी मिळू शकतो याबद्दल तिला विश्वास होता. यातूनच तिने अमेरिकेत पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान तिला अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीय तरुणाचं स्थळ आलं. यावेळी तिने तिचे भविष्याचे प्लॅन सांगितले असता त्या तरुणाने तिला अमेरिकेतील शिक्षणाबद्दल माहिती देत पुढील शिक्षण घेण्यास होकार दिला. त्यानंतर दोघांचा विवाह देखील पार पडला.

Advertisements
Advertisements

शुभदा हिने अमेरिका येथे सिलिकॉन व्हॅली येथे असलेल्या एका नामांकित विद्यापीठामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्लाऊड अँड वर्चलायझेशन मध्ये स्पेशलायझेशन केलं आहे. महत्वाचे प्रोजेक्ट पूर्ण केले. पदवी पूर्ण होताच तिला तिच्या कौशल्याच्या जोरावर अमेरिकेतील एका कंपनीची नोकरी मिळाली असून त्या ठिकाणी तिला दीड करोड रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळालं आहे.

मला अमेरिकेसारख्या देशात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. मात्र, याचं सर्व श्रेय कुटुंबीयांना जातं. त्यांनी लहानपणापासून मला स्वातंत्र्य दिले आणि मी ते सार्थ करून दाखवलं. त्याचबरोबर मला माझ्या पतीने खंबीर साथ दिली यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले, असं शुभदा हिने बोलून दाखवलं.

शुभदाची आई सांगते की, ”बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे लहानपणापासून अभ्यास क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये तिने ठसा उमठवला. आज आई वडिलांचे नाव साता समुद्रापार नेणाऱ्या लेकीचा अभिमान वाटतो. यामुळे सर्वांच्या पोटी अशीच लेक यावी”. लेकीच कौतुक करतांना तिच्या आईचे डोळे भरून आले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button