सप्टेंबरमध्ये ठरलं, फेब्रुवारीत घडलं, आणखी होणार भूकंप, कुणी केला खळबळजनक दावा?
हिंगोली : शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षानंतर आता देशातील सर्वात जुना पक्ष कॉंग्रेस हा फुटीरतेच्या उंबरठ्यावर आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या आमदारकीचाही राजीनामा त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला. गेले काही महिने अशोक चव्हाण पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्यासह आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. अखेर, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
अशोक चव्हाण हे कॉंग्रेसमध्ये नाराज होते. पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याची त्यांची खदखद होती. यातच भाजपने विरोधाकांमागे ईडी चौकशी लावल्याने अनेक विरोधक भाजपमध्ये गेले. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आणि अजित पवार यांच्यासह 35 आमदार गेले. त्यामुळे पुढील गडांतर कॉंग्रेसवर येणार हे जवळपास निश्चित होते. यात अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते.
अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने बुलढाणा अर्बन बँकेकडून 200 कोटींचे कर्ज घेतले होते. याच प्रकरणी कारखान्याचे कुटुंबियांची ED चौकशी होणार अशी कुजबुज होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांची धास्ती वाढली होती. नागपूरचे कॉंग्रेसचे माजी आमदार आणि भाजपात प्रवेश केलेले आशिष देशमुख यांच्या घरी गणपतीनिमित्त अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. सुमारे वीस मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. मात्र, या भेटीनंतर ही अचानक झालेली भेट होती अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली होती.
माजी आमदार आशिष देशमुख यांनी दिल्लीतील हाय कमांडवर टीका केली. पक्षांचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही त्यांनी सोडले नाही. अशावेळी कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, आमदार अशोक चव्हाण यांनी आशिष देशमुख यांच्या घरी सप्टेंबर महिन्यात गणपतीला गेले त्याचवेळी त्यांच्याभोवती संशयाची सुई निर्माण झाली होती, अशी माहिती कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
अशोक चव्हाण यांच्यासोबत किमान 11 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस नेते सर्व आमदारांच्या संपर्कात आहेत. 14 फेब्रुवारीला कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, ही बैठक होण्यापूर्वीच शिंदे गटाच्या आमदाराने आणखी एक बॉम्ब फोडला आहे. पुढील आठ दिवसामध्ये एवढा मोठा स्फोट होईल की काँग्रेस संपुष्टात येईल. काँग्रेस राहणारच नाही, असा दावा हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय.