मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती आरोप करणारे त्यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारसकर यांना हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.अजय बारसकर यांच्या हल्ल्याच्या कटाप्रकरणी पाच जणांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचं उल्लंघन आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय बारसकर हे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलबाहेर संशयास्पदरित्या फिरताना, शुक्रवारी दोघांना घेण्यात आलं होतं, तर तिघांनी पळ काढला होता. यानंतर आता पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दोन संशयित ताब्यात
बारसकर यांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांवर हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. कट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी काल ताब्यात घेतले. बारसकर यांची पत्रकार परिषद होती, पण हल्ला होण्याची त्यांना कुणकुण लागली, त्यामुळे पत्रकार परिषद रद्द केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सध्या हे दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
अजय महाराज बारसकर यांचा हल्लाबोल
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर तुफान हल्लाबोल केला होता. मनोज जरांगे खोटारडा माणूस आहे, तो रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका झाल्या, असे घणाघाती आरोप अजय बारसकर यांनी केले होते.
मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून नाय प्यायला. मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला, असं अजय बारसकर म्हणाले होते.