बोगस बियाणे विक्री करणा-या कृषी दुकानदारावर गुन्हा दाखल
मानवत : येथील पाळोदी रोडवर असलेल्या मुक्ताई कृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये कापसाचे बीटी बियाणे बोगस विक्री होत असल्याची माहिती कृषी खात्याला मिळाली होती. त्यानंतर कृषी खात्याच्या गुण नियंत्रण विभागाकडून या दुकानदाराकडे बनावट ग्राहक पाठवून बोगस बियाण्याची विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी दुकानदारावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपी अद्याप अटक नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मानवत येथील पाळोदी रस्त्यावर असणा-या मुक्ताई सेवा कृषी केंद्र या दुकानात कापसाच्या बोगस बीटी बियाण्याची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या दुकानावर बनावट ग्राहक शेतकरी त्रंबक शेळके यांना पाठवून कापूस बियाणे खरेदी करण्यात आले. त्यांना या दुकानदाराने पीकिंग नावाचे ४७५ ग्राम वजनाचे दोन पाकीट विक्री केली. त्यानंतर फिर्यादी व सोबतचे कृषी अधिकारी यांनी मुक्ताई कृषी सेवा केंद्र येथे जाऊन स्थळ पंचनामा केला व शेतकरी प्रल्हाद शेळके यांचा जबाब घेतला. दोन पाकिटे कृषी विभागाचे ताब्यात घेऊन पंचनामा केला. सदर पॉकेटचे पाहणी केली असता सदर पाकिटावर आवश्यक असलेला कंपनीचे नाव, नंबर, डेट ऑफ टेस्ट व्हॅलेडीटी व किंमत आढळली नाही.
त्यानंतर मुक्ताई कृषी सेवा केंद्र यांनी दिलेल्या माहिती नुसार श्री सीड अँड फटीर्लायझर यांचे गोडाऊनची तपासणी केली असता काही आढळून आले नाही. श्री सीड्स अँड फटीर्लाझर यांचे मालक यांनी जवाब दिला नाही. यावरून संबंधित दुकानदार मुक्ताराम बाबुराव रोडे यांनी एसबीटी अनधिकृत कापूस बियाणे साठवणूक उत्पादन वितरण व विक्री केल्यामुळे त्यांच्यावर प्रवीण विठ्ठल भोर (तंत्र अधिकारी गुण नियंत्रक विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बियाणे कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा व आवश्यक वस्तू कायदाचे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रमेश स्वामी हे करीत आहेत.