परभणी: मराठे तुमचेच आहेत. यांनीच तुम्हाला गादीवर बसविले आहे. तुम्ही जाणूनबुजून मराठ्यांना वाकड्या वाटेला जाऊ देऊ नका. आणखीही संधी, वेळ गेलेली नाही. दोन दिवस हातात आहेत. सरकारने गैरसमजातून बाहेर यावे. मराठा आरक्षणाचा विषय गांभार्याने घ्यावा, तोडगा काढायचा प्रयत्न करावा. विनाकारण नोटीसा बजावून आता जास्तीच मराठ्यांना संतप्त होऊ देऊ नका, असे आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सेलू (जि.परभणी) येथील सभेत शुक्रवारी सरकारला केले.
सेलू तालुक्यातील अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर गाठी-भेटी दौऱ्यांतर्गत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता जाहीर सभा आयोजिण्यात आली होती. त्यावेळी जरांगे पाटील बोलत होते. भरउन्हात सभेला लाखोंच्या संख्येने मराठा जनजागर लोटला होता. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृटी करून जरांगे यांनी अभिवादन केले. मराठा भगिनींनी जरांगेंचे औक्षण केले. सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले येथील हुतात्मा अनंत लेवडे यांच्या आईवडिलांच्या हस्ते जरांगे यांचा सन्मान करण्यात आला.
सरकारने आता तरी भानावर यावे. नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करून नये. महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असा इशारा देऊन जरांगे पाटील म्हणाले, की कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे. १९६७ च्या आधीपासूनचे पुरावे सापडले आहेत. गायकवाड आयोगाने मराठ्यांना बारा-तेरा टक्क्यांनी मागास सिद्ध केले. सर्व निकष पूर्ण केले तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांनी निकष पूर्ण केले नाहीत, तरी त्यांना आरक्षणात घेतले. ज्या लेकरांची एका टक्क्याहून संधी हुकली. त्या लेकराचे आयुष्य आणि भविष्य उध्द्वस्त झाले आहे, याची जाणीव असू द्या. मराठ्यांच्या डोक्यात आले, तर लेकरांच्या हितासाठी मराठा कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पण मराठ्यांनाही मर्यादा आहेत, असा निर्वाणीचा इशाराही जरांगे यांनी सभेतून दिला.
महिलांचा आजपासून जागर
आरक्षणासाठी मराठ्यांचा हा लढा अंतिम टप्प्यात आहे. ८० टक्के लढाई जिंकली आहे. त्यामुळे बेसावध राहू नका. अशी संधी पुन्हा येणार नाही. तुम्ही खांद्याला खांदा लावून लढा. मी मरायला भीत नाही. आता बेसावध राहू नका. एकजूट दाखवा. गावेची गावे पिंजून काढा. जागृती करा. महिलांनीही मागे हटू नका. २३ डिसेंबरपासून महिलांनीही दररोज आरक्षणाचा जागर घालायला सुरूवात करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले.
दरम्यान, जरांगे यांचे ३१ जेसीबीतून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. सभास्थळी चोहोबाजूंनी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. घराच्या छतावर, रस्त्यारस्त्यावर, नूतन महाविद्यालयाच्या सागवान झाडांच्या प्रकल्पात बसूनही मराठा बांधवांनी सभेला हजेरी लावली.