नागपूर : सर्कस पाहून येताना झालेल्या अपघातात मेंदूमृत घोषित झालेल्या महिलेच्या अवयवदानाने तिघांच्या आयुष्यात नवा प्रकाश पडला आहे. ज्योती राजकुमार डोंगरे (वय ४५) असे या अवयवदात्या महिलेचे नाव असून, त्या इंदोरा येथील रहिवासी होत्या. जयताळा भागात सध्या सर्कस सुरू आहे. ती पाहण्यासाठी ज्योती व अन्य नातेवाईक गेले होते.
सर्कस संपल्यावर त्या मुलीसह मोपेडने परतत होत्या. सुभाषनगर टी पॉइंट येथे त्या मोमोज घेण्यासाठी थांबल्या. त्यावेळी मुलगी मोमोज घ्यायला गेली, तर ज्योती या मोपेडवरच होत्या. त्याचवेळी एका भरधाव कारने त्यांना धडक दिली.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गेले दोन दिवस तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना डॉ. ध्रुव बत्रा, डॉ़. अजय साखरे, डॉ. अजय कुर्वे, डॉ. देवेंद्र देशमुख या तज्ज्ञांच्या चमूने मेंदूमृत घोषित केले.
त्यानंतर डॉ. अजय कुर्वे व सुषमा अवचार यांनी मुलगी साक्षी, पती राजकुमार यांचे अवयवदानाविषयी समुपदेशन केले. त्यांनी संमती दिल्यानंतर लगेच विभागीय प्रत्यारोपण समितीला कळविण्यात आले.
त्यानुसार यकृताचे प्रत्यारोपण सेव्हन स्टार हॉस्पिटलमधील ६८वर्षीय पुरुषावर करण्यात आले. एक किडनी केअरमध्ये ४५ वर्षांच्या महिलेला, तर दुसरी ऑरियस हॉस्पिटलमधील ३१ वर्षांच्या पुरुषाला देण्यात आली. फुप्फुस प्रत्यारोपणासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम नव्हते. महात्मे नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले. विवेकातर्फे ज्योती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच त्यांचे पार्थिव घरी पाठविण्याची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली.