राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या भाषणामुळे आता चर्चेत आले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे. यावेळी कोल्हे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. मात्र साहेबांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते भावूक झाल्याचेही दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर शरद पवारांनी आपल्यासोबतच राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आहेत. आपल्या नावाचा आणि फोटोचा वापर बंडखोरी केलेल्यांनी करुन नये असे सांगितले होते.
यासगळ्यात डॉ. कोल्हे यांनी मांडलेली भूमिका अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. यापूर्वी कोल्हे हे अजित पवारांच्या शपथ विधीच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. त्यावेळेपासून कोल्हे यांच्या भूमिकेविषयी विचारणा केली जात होती. त्यावरुन प्रश्नही विचारले जात होते. मात्र कोल्हे यांनी बाप हा बाप असतो. त्यांना सोडून जाता येणार नाही. अशा आशयाचे ट्विट केले होते. यामुळे वाय बी सेंटरमध्ये कोल्हे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
सभेमध्ये कोल्हे म्हणाले की, श्रीकृष्णाने गोवर्धन करंगळी वर उचलला ती भूमिका आता साहेब बजावत आहेत. त्यांची भूमिका महत्वाची आहे. कितीही अडचणींचे आभाळ आले तरीही आपण त्यांना सामोरं जायला तयार आहोत. आज पवार साहेब बरोबर उभे राहताना मला वाटते की, माझ्या बापानं स्वाभिमानानं अनेकांना कष्टानं चटणी भाकरी दिली.
एडी सीबीआय पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. चिखलात उभे राहून संघर्ष करत योद्धा उभा राहतो. हे काही पहिल्यांदा घडलेले नाही. सातत्यानं होते आहे. त्या दिवशी मी राजभवनात होतो. पण मी तिकडे मी खासदारकी राजीनामा द्यायला तयार होतो. पक्ष फोडले विचारधारा सोडली तर राजकारण मधील नैतिकता जाते. विश्वासार्हता कमी होते.
कुरुक्षेत्रावर कृष्ण अर्जुनाला म्हणाला होता की, लढाई नात्यांची नाही ती कर्तव्यांची आहे. ही लढाई धर्म अधर्माची आहे. तसं आपल्याला पवार साहेबांसोबत उभं राहावे लागणार आहे. ते आपले कर्तव्य आहे. असेही डॉ. कोल्हे यांनी यावेळी सांगितले.