पेडगाव : येथे मागील दोन वर्षापासून एसटी महामंडळाची बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने गावातील नागरीकांनी निवेदन देऊन एस टी महामंडळाला बस सेवा सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या मागणीची दखल घेत एस.टी. महामंडळ विभाग नियंत्रक यांनी दि.०७ जुलै पासून बस सेवा सुरू केली असून गावात बस येताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी शिष्टमंडळासह २२ जून रोजी विभाग नियंत्रक परभणी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. पेडगाव मध्ये बस सुरू न केल्यास ०३ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.
परंतु एस.टी. महामंडळ विभाग नियंत्रक यांनी शुक्रवार पासून बस सुरू केल्याने गावात बस येताच एस.टी बसचे वाहक प्रदीप हरकळ व चालक राजकुमार पाटील यांच्यासह या बस फेरीतून प्रवास करणारे प्रवाशांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच एस.टी बसला हार घालून नारळ फोडण्यात आले. बस सुरू झाल्याने गावातील विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिकांना परभणीला ये- जा करण्यासाठी सुविधा होणार आहे. तसेच बस अभावी विद्यार्थ्यांचे होणार नुकसानही टळणार आहे.
यावेळी पेडगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेशराव देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, सरपंच आशिष हरकळ, उपसरपंच शेख सलमान, चेअरमन दीपक देशमुख, बाळासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ देशमुख, हरीश खान, पुरुषोत्तम देशमुख, अजीम खान, बाळासाहेब देशमुख, शेख अकबर, प्रशांत हरकळ, मनोहरराव हरकळ, मोबीन भाई, बालासाहेब हरकळ, एजाज भाई, मनोज धर्माधिकारी, गजानन देशमुख, सय्यद रियाज, मधुकर गायकवाड, गुलाबराव देशमुख, पंताकाका देशमुख यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.