सोलापूर : कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पावरून आता दुष्काळी पट्ट्यातील आमदार आक्रमक होतांना पाहायला मिळणार आहे. तसेच, या अधिवेशनात याबाबत आवाज उठवणार असून पाण्यासाठी आम्ही आक्रमक असल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटीलयांनी म्हटले आहे.
पावसाळ्यात सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील महापुरात वाहून जाणारे पाणी पुणे, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागात वळवण्याऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी बैठक घेतली होती. मात्र, पुढे याबाबत कोणतीही प्रगती न दिसल्याने दुष्काळी भागातील सर्व आमदार एकत्र येऊन नागपूर अधिवेशनात यासाठी आक्रमक पद्धतीने आवाज उठवणार असल्याचे शहाजीबापू यांनी म्हटले आहे. एका बाजूला महापुरामुळे सांगली, कोल्हापुरात कोट्यवधींचे नुकसान होते. दुसरीकडे त्याचवेळी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात पाण्याअभावी शेतकरी उध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा असेही शहाजीबापू म्हणाले.
विशेष म्हणजे, याच प्रकल्पावरून नुकतेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढ्यात बोलताना माझ्या हयातीत तरी ही योजना पूर्ण होणार नाही, त्यामुळे अशी बोगस स्वप्ने दाखवू नयेत असा टोला लगावला होता. याच प्रकल्पाच्या श्रेयावरून गेल्या दोन वर्षांपासून खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु आहे. यावर बोलतांना, “एखाद्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहून प्रश्न सुटणार नाही, असा सल्ला शहाजीबापुनी अजीत पवारांना दिला आहे. हा प्रकल्प मोहिते पाटील यांचा होता तर, त्यांनी तो अर्धवट का सोडून दिला. आता या प्रकल्पासाठी निंबाळकरांच्या प्रयत्नांना मोहिते पाटील यांनी साथ द्यावी अशी साद शहाजी बापू पाटील यांनी घातली आहे. आमच्या दुष्काळी भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. आता जानेवारीपासून पुन्हा शेकडो टँकर सुरु होतील. अशावेळी हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी आम्ही आक्रमक होणार असल्याचे देखील शहाजीबापू म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर देखील शहाजीबापू यांनी निशाणा साधला आहे. “नुसती डायलॉगबाजी करून राज्य चालवता येत नसते. संजय राऊत यांनी कधीही संविधानिक पदावर काम केले नसल्याने त्यांना याची माहिती नसेल. ते खासदार होतात ते आमच्या मतावर आणि राज्यात फक्त विषारी टीका करीत फिरतात,” असा खोचक टोला शहाजीबापू यांनी लगावला. तर, राज्यातील शिंदे सरकार 31 डिसेंबर रोजी पडेल या आदित्य ठाकरे यांच्या भविष्यवाणीचा समाचार घेताना शहाजीबापू म्हणाले की, आजवर यांची कोणती भविष्यवाणी खरी झाली. हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालणार असून, येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळवेल असा विश्वास शहाजीबापुनी व्यक्त केला.