जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजवला आहे. काल रात्री जोरदार कोसळलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना अचानक पूर आला, त्यातच रावेर तालुक्यात तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर रावेर शहरातील दोन जण बेपत्ता आहेत. यात बेपत्ता असलेल्यांमध्ये रावेर शहरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
रावेर तालुक्यात पहिल्याच पावसाने दाणादाण उडवली आहे. रावेर तालुक्यात काल बुधवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने जोर पकडला आणि दोन ते तीन तास मुसळधार पावसाने तांडव केला. यात रावेर तालुक्यातील नागझिरी, अभोडा आणि मात्रान या नद्यांना पूर आल्याने एकच धावपळ उडाली. यात रावेर शहरातील माजी नगरसेवक यांच्यासह एक जण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे दोघे बेपत्ता झाले आहेत. तर मोरव्हाल येथील अभोडा नदीत एका जणाचा मृत्यू झाला आहे. मोरव्हाल येथे बाबुराव रायसिंग बारेला याचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर इतर दोघांचा रात्रीपासून शोध सुरू आहे. दोघे ज्या दुचाकीवरून जात होते ती दुचाकी आढळली असून दोघांचा मात्र अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील रमजीपुर, रसलपुर, खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपुरमध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहेत. दरम्यान, घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पुराच्या पाण्यात गुरे सुद्धा वाहून गेले असून त्याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. एक चारचाकी गाडी वाहून गेली. गाडीतील प्रवासी यांनी वेळीच गाडीतून उडी घेत ते बाहेर पडल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहेत. दरम्यान याठिकाणी रात्रीपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचावकार्य सुरु असून नागरिकांचे प्राण वाचविण्यात आले. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बेपत्ता नागरिकांचा तपास तसेच मदतकार्य करण्याचे काम सुरू आहे.
रावेर तालुक्याचे तहसीलदार बंडू कापसे नुकसानग्रस्त भागातल्या नागरिकांच्या संपर्कात आहेत. महसूल प्रशासन तालुक्यात अजून कुठे नुकसान झाले आहे? याचा शोध घेत आहेत. रावेर शहरात माजी नगरसेवक सूरज चौधरी आपल्या टिमसह महसूल प्रशासनासोबत सहकार्य करत दोन व्यक्तींचा शोध घेत आहेत. तर रमजीपुरमध्ये सरपंच प्रकाश तायडे उपसरपंच योगिता कावडकर प्रा. उमाकांत महाजन नागरीकांना मदत करत आहेत. सदर नुकसानीचे पंचनामे करून अंतिम अहवाल देण्याचे काम सुरू आहे.