राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे. राज्यात १ आणि २ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. १ डिसेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस
उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे शहरातही आज पावसाची शक्यता आहे.
22 जिल्ह्यांतील नुकसानाची आकडेवारी
राज्यात 26 ते 28 पर्यंत झालेल्या अवकाळी पावसात 22 जिल्ह्यांतील नुकसानाची प्राथमिक आकडेवारी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. परंतु अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या यादीत अमरावती जिल्हा वगळला गेला आहे. अमरावती जिल्ह्यात नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक आकडेवारीत अमरावती जिल्ह्याचा समावेश नाही. अमरावतीत कापूस, तुरी आणि संत्र्याच मोठे नुकसान झाले आहे. परंतु शासनाच्या नजरेत अमरावती जिल्ह्यात नुकसानच झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते.