राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती, प्रतोदपदाचीही जबाबदारी दिली, कोणाचा व्हिप लागू होणार?
अजित पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामी झाले होते. अजित पवारांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासाच्या आतच शरद पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे. तसंच, विधिमंडळाच्या प्रतोदपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते पद बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. हे पद आता ठाकरे गटाला मिळावे अशी मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे अजित पवारांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. अजित पवारांनी शुक्रवारीच राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात मोठी घडामोड घडणार असल्याचे संकेत तेव्हाच राष्ट्रवादीला मिळाले होते.
दरम्यान, आज रविवारी सकाळीच अजित पवार त्यांच्या काही समर्थक आमदारांसोबत राजभवनात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्रिमंडळातील अनेक नेतेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद रिकामे झाले आहे. या पदावर आता जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रतोदपद अनिल पाटील यांच्याकडे होते. अनिल पाटील यांनी अजित पवारांसह बंडखोरी केल्याने त्या पदावरही पुनर्नियुक्ती गरजेची होती. त्यामुळे या पदावरही जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
“माझ्या भूमिकेवर पवारांचं कायम प्रेम होतं. त्यांच्या प्रेमामुळेच मी भूमिका घेत होतो. शोषितांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या चेहऱ्याला साहेबांनी आज विरोधी पक्षनेता केलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “माझ्यादृष्टीने शरद पवारच राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की पक्षनाव आणि निशाणी कोणी घेऊ शकणार नाही”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. “ज्या अर्थी साहेब कारवाई म्हणत आहेत, तोवर लढाई सुरू होईल. आता राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांकडेच आहेत. माझी प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पदी निवड केली आहे. त्यामुळे प्रतोद जो व्हिप काढेल तोच लागू होईल,” असंही आव्हाडांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकाच जिल्ह्यातील
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यात राहणारे असून जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघाही ठाणे जिल्ह्यात येतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकाच जिल्ह्याचे झाले आहेत.
“मी शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता”
“राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होतं. परंतू मी शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता आणि मागेही मी वर्धापनदिनाच्या निमित्ताने मी माझी स्पष्ट भूमिका मांडली होती,” असं अजित पवारांनी सांगितलं.