राजू शेट्टींची प्रकृती खालावली, ३ दिवसांपासून अन्नत्याग, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
कोल्हापूर : मणिपूरसह देशातील महिलांवर होत असलेल्या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती आय.जी.एम सरकारी रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर सलग तीन दिवस झालेल्या अन्नत्यागामुळे युरिनमध्ये अतिरिक्त कीटोनचे प्रमाण वाढल्याने डिहाइड्रेशन, थकवा, ताप येवून शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे रात्री उशिरा वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.
मणिपूरसहित देशातील इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून गेल्या तीन दिवसांपासून सलग ७२ तास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी इचलकरंजी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा राजू शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मणिपूरमध्ये नराधमांनी महिलांची नग्न धिंड काढून सामूहिक अत्याचार केला. या घटनेला जवळपास अडीच महिने झाले आहेत तरी केंद्र आणि राज्य सरकारला जाग आलेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारच्या शेकडो घटना झाल्याचे सांगत आहेत. यावरून बेफिकीर आणि बेजबाबदारपणा त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतो. या नराधमांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याने अन्य राज्यातही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे काहीच कारवाई होत नाही, असे या समाजकंटकांना वाटत आहे. मात्र, या घटनेमुळे सारा देश शरमिंदा झाला आहे, अशी खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
केंद्र आणि राज्याची जबाबदारी आहे तशी नागरिकांची सुद्धा आया बहिणींना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. ज्या घटना घडल्या आहेत त्याची नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही सहकाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. मात्र गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात राजू शेट्टी यांची आज तिसऱ्या दिवशी तब्यत खालावली असून रात्री उशिरा वैद्यकीय त्यांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये वैद्यकीय तपासणीनंतर सलग तीन दिवस झालेल्या अन्नत्यागामुळे युरिनमध्ये अतिरिक्त कीटोनचे प्रमाण वाढल्याने डिहाइड्रेशन, थकवा, ताप येवून शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे रात्री उशिरा वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.तर आय.जी.एम सरकारी रूग्णालयाचे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचे सल्लादेखील दिला असून राजू शेट्टी यांनी हा सल्ला नाकारला आहे. आंदोलन संपल्यानंतर मी रुग्णालयात दाखल होईल असे त्यांनी म्हटले असून मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.