पुणे : दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्याजवळील मंचर येथे एक भीषण अपघात झाला. पुणे – नाशिक महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. ही धडक एवढी भीषण होती, की त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पंकज खंडू जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी आहिरे ( वय ५०) सर्व रा. जायखेडा ता. सटाणा जि. सातारा अशी मृतांची नावं आहेत. तिघा जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटे रस्त्यावर दाट धुकं होतं, त्यामुळे रस्त्यावरील पुढची वाहने दिसत नव्हती. वेगाने जाणाऱ्या क्रूझर गाडीची मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली आणि एकच गदारोळ माजला. त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला असून क्रुझर चालकाला समोरच्या वाहनाचा अंदाज न आल्याने क्रुझरवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट मागून जाऊन समोर जड वाहतूक घेऊन चाललेल्या टेम्पोला पाठीमागून जाऊन जोरात धडक दिली.