कर्नाटकात मंकी फिव्हरचा कहर; दोघांचा मृत्यू; महाराष्ट्राला किती धोका? लक्षणं काय?
महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या फिव्हरची लागण ४९ जणांना झाली आहे. उत्तर कन्नड जिल्हा बेळगावच्या शेजारी आहे. बेळगावची सीमा महाराष्ट्राला लागून आहे.
मंकी फिव्हरचा वाढता कहर पाहता आरोग्य विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत. मंकी फिव्हरपासून बचाव करण्यासाठी तयारी सुरू आहे. मंकी फिव्हर म्हणजेच क्यासानूर फॉरेस्ट डिजीज (केएफडी) प्राण्यांपासून माणसांपर्यंत पोहोचतो. माकड्यांच्या माध्यमातून माणसांच्या संपर्कात येणाऱ्या ढेकणांमधून मंकी फिव्हरचा फैलाव होतो. १९५७ मध्ये पहिल्यांदा हा आजार ओळखण्यात यश आलं. अनेक माकडांमुळे याचा मृत्यू झाल्यानं त्याला मंकी फिव्हर म्हटलं गेलं.
महाराष्ट्राला किती धोका?
कर्नाटकातील पश्चिम घाट परिसरात सुरुवातीला मंकी फिव्हरचे रुग्ण आढळून आले. गेल्या दशकभरात या आजाराचे रुग्ण वाढले. पश्चिम घाट पसरलेल्या शेजारच्या राज्यांमध्येही मंकी फिव्हरचे रुग्ण आढळले. त्यात केरळ, महाराष्ट्राचा समावेश असल्याचं नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे संक्रामक आजार विभागाच्या सल्लागार असलेले डॉ. लक्ष्मण जेस्सानी यांनी सांगितलं.
कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरचे ३१ रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर घरांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी मंकी फिव्हर पसरलेल्या भागांमध्ये आवश्यक पावलं उचलण्याची गरज असल्याचं जेस्सानी म्हणाले.
मंकी फिव्हरची लक्षणं काय?
- जास्त ताप येणं
- डोळ्यांमध्ये सूज आणि वेदना
- जास्त थंडी वाजणं
- मांसपेशींमध्ये अधिक वेदना
- शरीरात वेदना होणं
- खोकला, सर्दी
- डोकेदुखी
- उलट्या
- रक्तस्राव
- प्लेटलेट्स कमी होणं
बचाव कसा करायचा?
वरील लक्षणं जाणवल्यास तातडीनं डॉक्टरांकडे जा. मंकी फिव्हरपासून बचाव करण्याचा एकमेव उपाय लसीकरण हाच आहे. त्यामुळे लसीकरण करुन घ्या. मंकी फिव्हरचा फैलाव झालेल्या भागातील लोकांनी वेळोवेळी तपासणी करुन घ्यावी. मंकी फिव्हरपासून बचाव करणाऱ्या लसीचे दोन डोस एका महिन्यात दिले जातात.
आसपासच्या भागात स्वच्छता ठेवा. ढेकणांपासून बचाव करण्यासाठी अंग पूर्ण झाकतील असे कपडे घाला. घरातून बाहेर पडताना काळजी घ्या. संपूर्ण अंग झाकू शकणारे कपडे घालून बाहेर पडा.