अजित पवार गटाला मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार 4 मंत्री पदे… शिंदे गटाचे काय होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींनी वेग आला आहे. राज्यात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत, यादरम्यानराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता समोर आली आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्री असू शकतात. तर आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या 29 असून आणखी 14 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भाजप आणि सेनेतील मंत्रिपदाच्या प्रतिक्षिते असलेल्या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा देखील समोर आले आहे.
आधीच चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीला आणखी चार मंत्रीपदे मिळणार आहेत. यामध्ये एक कॅबिनेट तर इतर तीन राज्यमंत्री असतील, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राष्ट्रवादीला 14 पैकी चार मंत्रिपद मिळाले म्हणजे भाजप आणि सेनेला प्रत्येकी पाचवर समाधान मानावे लागणार आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून 2 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांसह एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांपासूनरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले नाहीये. सोमवारी दुपारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावा केला की पोर्टफोलिओ वितरण काही तासांत जाहीर केले जाईल, परंतु अद्याप याबद्दल कुठलीही माहिती समोर आली नाहीये.