कोल्हापूर जिल्ह्यात झिका व्हायरसची एन्ट्री झाली असून जिल्ह्यातील इचलकरंजी येथे झिका व्हायरसचे तीन संशयित रुग्ण सापडले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू करण्यात आले असून तीन रुग्णांपैकी एक हा पेशाने डॉक्टर आहे. तर दोन रुग्णांवर इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
कोरोना संसर्ग हा आता कमी झाला असून यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडलेला असतानाच आता पुन्हा एकदा एक नवीन व्हायरस डोकं वर काढू लागला आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईतील चेंबूर येथे झिका वायरस चा एक रुग्ण मिळाला होता यानंतर आता कोल्हापुरातील इचलकरंजी येथे तीन नवे संशयित रुग्ण समोर आले असून या तिघांपैकी एक जण डॉक्टर आहे. इचलकरंजी प्राथमिक आरोग्य केंद्र तांबेमाळ येथे झिका वायरस विषाणू सदृश्य एक रुग्ण आढळून आला असून २ सप्टेंबर रोजी आणखी दोन संशयित रूग्ण मिळाले असून या तिन्ही रुग्णांचे रक्तजलाचे नमुने हे पुणे येथील एन आय व्ही कडे खाजगी प्रयोगशाळेमार्फत पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल अद्याप मिळालेला नसून उद्या पर्यंत अहवाल मिळणे अपेक्षित आहेत.
पहिला रुग्ण हे ३८ वर्षीय पुरूष असून न्युरोफिजिशियन आहे, त्याचे स्वतःचे क्लिनिक आहे. ते कोकणामध्ये देवदर्शनासाठी गेले होते. गाडी पार्किंग करण्याच्या ठिकाणी त्यांना डासांचा मोठा त्रास झाला होता. त्यानंतर ते आजारी पडले त्यांची त्यांचे रक्त तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये झिका सदृश्य विषाणू आढळून आला. या रुग्णा पाठोपाठ आणखी दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक जण ही गरोदर असून एका संशयित रुग्णाच्या घरी सहा व्यक्ती असून त्यापैकी तिघांचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर सर्व रुग्णांचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
इचलकरंजीतील तांबे माळ व गावभाग परिसरात रुग्ण आढळून आल्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणा तात्काळ गतिमान झाली आहे. यातील दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झिका व्हायरस हा प्रामुख्याने डासामुळे पसरतो त्यामुळे रविवारपासून पालिकेची यंत्रणा ही अधिक गतिमान झाली असून औषध फवारणीचे काम आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच हा विषाणूजन्य आजार आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे