कोल्हापूर : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याचा कोल्हापुरात अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवितहानी झालेली नाही. मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन करून झाल्यानंतर तानाजी सावंत जोतिबाला दर्शनासाठी जात होते. यावेळी मंत्री तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते त्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये तानाजी सावंतयांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्याच ताफ्यात जिल्हा प्रशासनाची रुग्णवाहिका नसल्याचे समोर आलं आहे. सावंत यांच्या ताफ्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही रुग्णवाहिका सहभागी नव्हती.
तानाजी सावंत यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण
दुसरीकडे, कोल्हापूर (Kolhapur) उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सुरु असलेल्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने तयारी झाली आहे. मात्र, हा व्हेरियंट सौम्य आहे. केरळमध्ये जे तीन मृत झाले त्यात जेएन 1 नव्हता. काल (23 डिसेंबर) टास्क फोर्सची याबाबत बैठक झाली. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील. त्यांच्यासोबत काल माझी बैठक झाली आहे. येत्या काळात गर्दीचे कार्यक्रम आहेत. नागरिकांनी काळजी घेऊन गर्दीच्या कार्यक्रमाला जायला हवं. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं आहे.
कोणत्याही सरकारी दवाखान्यात साहित्य धुळखात पडून नसल्याचा दावा
कोणत्याही सरकारी दवाखान्यात साहित्य धुळखात पडून नसल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला. कोल्हापूरमध्ये कोविड काळात झालेल्या साहित्य खरेदी घोटाळ्याची मी पूर्ण माहिती घेतली नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, कोणी दोषी आढळलं, तर कावाई नक्की होणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर तानाजी सावंत यांनी अधिक प्रतिक्रिया देणं टाळले. जरांगे पाटील यांच्या निर्णयाबाबत पक्षाचे वरिष्ठच बोलू शकतील, असे सांगत सावध पवित्रा घेतला.