परभणी : बाभुळगाव येथी गट नंबर १५४ या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी, प्रदुषण निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प बाभुळगाव येथे उभारण्यात येवू नये अशी मागणी शुक्रवार, दि.०७ जुलै रोजी बाभुळगाव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बाभुळगाव येथील गट नंबर १५४ या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे बाभुळगाव गावात घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी आणि जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊन गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. या प्रकल्पास बाभुळगाव ग्रामपंचायतचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे सदरील प्रकल्प बाभुुळगाव या ठिकाणी उभारण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर बाभुळगाव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत.