नवी दिल्ली : गुन्हेगारी मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अपीलावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच न्यायालयात राहुल गांधींची याचिका मंजूर करण्यात आली असून या प्रकरणावर २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधींच्या वकिलांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुजरात उच्च न्यायालयानेही सुरत न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयाविरोधात राहुल गांधींच्या वतीने वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, राहुल गांधींना लगेच जामीन मंजूर करण्यात आला. मात्र दोषी घोषित केल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली. संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होत आहे. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्या बाजूने निर्णय दिला तर राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकतात.