नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. देशात बऱ्याच काळानंतर मिळालेल्या या दणकेबाज विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. कर्नाटक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र भाजपला विजय मिळवून देण्यात मोदींचा करिष्मा देखील कमी पडला. मात्र आता भाजपच्या पराभवाची विविध कारणे समोर येत आहे.
कर्नाटकमधील पराभवासाठी भाजपने चालवलेलं ऑपरेशन लोटस देखील कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. त्याच कारण म्हणजे भाजपने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडलं होतं. त्यावेळी भाजपने काँग्रेस-जेडीएस आणि दोन अपक्ष असे 18 आमदार फोडून सत्तास्थापन केली होती. मात्र या निवडणुकीत भाजपने आपल्या बाजुला घेतलेले 18 पैकी बहुतांशी आमदार पराभूत झाले आहेत.
यामध्ये काँग्रेसचे १३, जेडीएसचे तीन आणि अपक्ष २ आमदार होते. मात्र यापैकी सहाच आमदार विजयी होऊ शकले. तर दोन आमदारांनी निवडणूक लढवली नाही.
एकंदरीतच २०१८ मध्ये कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काँग्रेसने जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षासोबत सत्ता स्थापन केली होती. मात्र भाजपने ऑपरेशन लोटस राबवून काँग्रेस-जेडीएसचं सरकार उलथवून टाकलं होतं. मात्र कर्नाटकमधील जनतेला अशा प्रकारचं सरकार आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे कर्नाटकमधील जनतेने यावेळी भाजपला नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे.
काही दिवसांपूर्वीच एक सर्व्हे आला होता. त्यामध्ये भाजपला कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा कमी होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. या तीनही राज्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस राबविण्यात आलं होतं. एकूणच या तीन राज्यातील सर्व्हे आणि कर्नाटकचा निकाल यावरून तरी जनतेला तोडफोडीचं सरकार आवडत नाही, हे स्पष्ट होत आहे.