महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

मनोहर जोशी यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज दुखःद निधन झालं आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 3.02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं थांबवल्याचे समोर आले. दरम्यान अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. मनोहर जोशी यांचं दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र यावेळी त्यांचं निधन झालं.

जीवाला जीव देणारे शिवसैनिक…, उद्धव ठाकरे

मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, लोकसभा अध्यक्ष होते केंद्रीय मंत्री होते पण त्यापेक्षाही ते सच्चा, कट्टर शिवसैनिक होते. कोणत्याही पक्ष किंवा कोणत्याही नेत्यांच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. मात्र कठीण परिस्थितीतसुद्धा मनोहर जोशी हे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले, शिवसेना प्रमुखांसोबत ते कायम राहिले. जीवाला जीव देणारे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक होते आणि ते आपल्यातून निघून जातात हे फार दुर्दैव आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. दरम्यान, आज उद्धव ठाकरे हे बुलढाणा दौऱ्यावर होते. त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला आजचा बुलढाण्यातील नियोजित दौरा रद्द केला आहे.

Advertisements
Advertisements

राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन् सच्चा शिवसैनिक

ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत… भावपूर्ण श्रद्धांजली!’

पुढे त्यांनी असेही म्हटले, महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले. शिवसेना – भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button