नवी दिल्ली : सोने आणि दागिन्यांची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, ३१ मार्च २०२३ नंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृती विकल्या जाणार नाहीत. चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
१ एप्रिलपासून नवीन नियम
नवीन नियम लागू झाल्यानंतर १ एप्रिल २०२३ पासून फक्त सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. त्याशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. ग्राहकांच्या हितासाठी असा ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
सरकारने शुक्रवारी सांगितले की १ एप्रिलपासून सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला सहा अंकी अल्फान्यूमेरिक HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) शिवाय परवानगी दिली जाणार नाही. सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी सरकारने दीड वर्षापूर्वी प्रयत्न सुरू केले होते.
आढावा बैठक
अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) क्रियाकलापांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. बैठकीत गोयल यांनी BIS ला देशात चाचणीसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले. BIS ला ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी वापरल्या जाणार्या घटकांच्या तीव्रतेनुसार उत्पादन चाचणी आणि बाजार निरीक्षणाची वारंवारता वाढवण्यास सांगितले होते.
ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीसाठी आधार कार्ड असते, त्याचप्रमाणे दागिन्यांच्या ओळखीसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक असतो. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे ज्यामध्ये अंक आणि अक्षरे असतात, जे ज्वेलर्सद्वारे नियुक्त केले जातात. या क्रमांकाच्या मदतीने दागिन्यांशी संबंधित प्रत्येक माहिती उपलब्ध आहे. जसे दागिन्यांची शुद्धता, वजन आणि ते कोणी विकत घेतले इत्यादी.