माना के अंधेरा घना है, पर दिया जलाना कहां मना है !
गंगाखेडला संगीतप्रेमींची सांस्कृतिक दिवाळी

गंगाखेड : शहर आणि परिसरातील लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक परंपरेस संजीवणी देण्याचा स्तुत्य उपक्रम गंगाखेडच्या संगीतप्रेमींकडून राबवण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांनी भक्ती, भाव गितांसह दर्जेदार फिल्मी गाण्यांचा आनंद लुटला. नैसर्गिक संकटे गडद झालेली असताना असे उपक्रम समाजात आनंदाचे आशादायी वातावरण निर्माण करत असल्याच्या भावना यानिमित्ताने व्यक्त करण्यात आल्या.
उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात दिवाळी निमित्ताने दिपसंध्या या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार ऊषाकिरण श्रृंगारे, बांधकाम विभागाचे उपअभियंता अरविंद बामणीकर, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
नांदेड येथील सुप्रसिद्ध प्रा. अशोक ठावरे संचलीत स्वर निनाद या संगीत संचाने एकाहून एक गीते सादर केली. संचाचे गायक श्रीरंग चितेवार, गायिका सुलेखा ऊदय, वंदना मुगटकर यांच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तर व्हॉईस ऑफ किशोर कुमार नावाने प्रसिद्ध असलेले सोनी टिव्ही स्टार राजू काजे यांनी सादर केलेल्या गितांनी उपस्थितांची मने जिंकली. चला हवा येवू द्या फेम सतीष कासेवार यांनी सादर केलेल्या विनोदांनी मनमुराद हसवले. उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी सादर केलेल्या गीतांनाही श्रोत्यांची दाद मिळाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद यादव यांनी केले. बऱ्याच वर्षांनंतर संपन्न झालेल्या या संगीत मैफीलीबद्दल शहरातील दर्दी, संगीतप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

