जगात जर्मनीताज्या बातम्यादेश -विदेशपरभणीमहाराष्ट्र

जनता दरबार हा मेघना बोर्डीकरांचा राजकीय ‘अश्वमेध महायज्ञ !’

सामान्यांची मने जिंकली तर स्वपक्षीयांसह विरोधक सावध !

परभणी : अश्वमेध महायज्ञ करून आपल्या राजपदाची घोषणा आणि आजूबाजूच्या प्रदेशात आपला घोडा सोडणे, ही पुराणकाळातील मोठ्या राजांची प्रसिद्ध प्रथा होती. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विराजमान होताच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही जनता दरबाराच्या रूपाने ‘अश्वमेध महायज्ञ’ च घोषीत केल्याची चर्चा सध्या परभणी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता जिल्ह्याच्या चारी बाजूस असलेले राजकीय संस्थानिक बोर्डीकरांच्या या अश्वमेधाचे कसे स्वागत करतात, याकडे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

भारतीय जनता पार्टीतील वरीष्ठांनी परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा विजय मीळवलेल्या मेघना बोर्डीकर यांना मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडेच देवून बोर्डीकर ह्यांच्यावर वरीष्ठांचे विशेष लक्ष असल्याचे दिसून आले. पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात कामकाजाची सुरुवात करताच ना. बोर्डीकर यांनी प्रशासकीय बैठकांचा धडाका लावला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पालकमंत्री टास्क फोर्संची स्थापना करत आपले वेगळेपण सिद्ध केले. यानंतर घेण्यात आलेल्या जनतादरबाराने मेघना बोर्डीकर यांचेकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षा चांगल्याच उंचावल्या.

सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी आयोजीत जनता दरबारात नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली. दुपारनंतर तर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करावे लागले. यावेळी वैयक्तिक समस्यांसह विविध प्रकारच्या साडे सहाशे सार्वजनिक समस्या जनता दरबारात मांडण्यात आल्या. पालकमंत्री मेघना बोर्डीकर स्वतः दहा ते बारा तास जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसल्या होत्या. यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह सर्वच प्रशासकीय अधिकारी संपुर्ण दिवस कार्यालयात हजर असल्याचे दिसून आले. पालकमंत्री ॲक्टीव्ह मोडवर असल्याने प्रशासनही या दरम्यान सतर्क असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री लाभल्याने आता आपल्या समस्या तात्काळ मार्गी लागतील, असा आशावाद सर्वसामान्य व्यक्त करताना दिसत होते.

जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जनसेवेचा जिल्हास्तरीय अश्वमेध महायज्ञच प्रज्वलित केल्याचे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नागरिकांनी या दरबारात आपल्या समस्या मांडल्या. यांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागलेले असून सोडवणूक झालेल्या समस्यांचे अपडेट पालकमंत्र्यांना दिले जात आहेत. जनता दरबाराचा चांगला पायंडा मेघना बोर्डीकर यांनी सुरू केला असून यात सातत्य टिकवण्याची अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

राजकीय पटलावर मात्र या जनता दरबाराकडे बोर्डीकर यांच्या जिल्हा स्तरावरील राजकीय नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न म्हणून बघीतले जात आहे. बोर्डीकर यांचे हे पाऊल म्हणजे एक राजकीय अश्वमेध असून त्यांच्या या राजकीय अश्वाचे स्वागत महायुतीतील घटकपक्षांसह विरोधी पक्ष कसे करतात, यावर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button