
गंगाखेड : शहराच्या मुख्य रस्त्यासह विविध भागांमध्ये कॅफे हाऊस, चायनीज हॉटेल सुरू झाले आहेत. या ठिकाणी येणारांना प्रायव्हसी उपलब्ध करून दिली जात असल्याने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होवू लागले आहेत. कॅफे हाऊस मधील हे प्रायव्हसी अड्डे बंद करून शहरातील रोमीओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

यासंदर्भाने गोविंद यादव यांनी आज पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांची भेट घेवून निवेदन सादर केले. शहरातील अनेक कॅफे हाऊस मध्ये आवश्यकता नसताना छोट्या केबीन करून त्यांना पडदे लावण्यात आलेले आहेत. या छोट्या केबीनमध्ये अश्लील चाळे करण्याबरोबरच अवैध नशापाण केल्याचे प्रकार घडत आहेत. अशा खास जागा उपलब्ध करून देण्यासाठी हॉटेल चालक जादा रकमांची वसुली करत असल्याची बाब यावेळी गोविंद यादव यांनी पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्या निदर्शनास आणून दिली.
शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गाचे ठिकाणी रोडरोमीओंचा वावर वाढलेला आहे. अल्पवयीन मुलींचा पाठलाग करणे, त्यांना धमकावणे, वेगवेगळ्या कारणांनी त्यांना ब्लॅकमेल करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी चिडीमार पथक, दामिनी पथक सक्रिय करावे. सर्व ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे, अशी मागणी गोविंद यादव यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी या निवेदनाची दखल घेत शहरातील कॅफे चालकांना ठाण्यात पाचारण केले असून हे प्रकार थांबतात काय याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



