वै.उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्कारांचे आज वितरण
कर्तबगारांचा सन्मान : राजेश विटेकर यांनी केले आयोजन
परभणी
(प्रतिनिधी):-
अथक परिश्रमाने प्रतिकूल परिस्थितीत कर्तबगारी सिध्द केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या माजी आमदार वै.उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्कारांचे आज सोनपेठ तालुक्यातील मौजे.विटा (खु) मधील श्री.चिंतामणी कृषी तंत्र विद्यालय येथे मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
सामान्य घरातल्या वै.उत्तमराव विटेकर यांनी संघर्षातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक केला होता. सर्वसामान्य लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी म्हणून समाजात छाप पाडली होती. त्यांनी राजकारणाला समाजकारणाची जोड दिली होती. म्हणून ते लोकांना आपले आमदार नव्हे तर पाठीराखे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतींचे स्मरण ठेवून कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदाचे हे नववे वर्ष आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून हभप.भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे रसाळपूर्ण कीर्तन सकाळी ११ ते १ या वेळेत होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण आणि भोजनाचा कार्यक्रम होईल.
सामाजिक बांधिलकी जोपासून याही वर्षी मोठ्या आत्मीयतेने वै.उत्तमराव विटेकर स्मृती पुण्यस्मरण व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. मधल्या काळात कोरोनामुळे कार्यक्रम घेता आला नाही. मात्र, त्याही वर्षीचे पुरस्कार यंदा वितरीत केले जाणार आहेत. त्या माध्यमातून वडीलांची शिकवण आणि संस्कार जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी सांगितले.
पंजाबराव डक, हभप.भगवान महाराज इसादकर, जनार्धन आवरगंड, शिवाजीराव गयाळ, हभप.पंढरीनाथ कदम, कृष्णा भोसले, पंडीतराव थोरात, हभप.अर्जुन महाराज लाड गुरूजी, हभप.तुकाराम महाराज यादव, हभप.भारत महाराज कानसूरकर, हभप.नरहरी महाराज निश्चळ, डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज, हभप.साहेबराव महाराज कोठाळकर दादा, प्रतापराव काळे आणि मेघाताई देशमुख यांचा पुरस्कारार्थी मध्ये समावेश आहे.
तरी व्यापारी, शिक्षक, उद्योजक, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व पक्षीय पदधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पत्रकार, युवक, युवती, महिला व नागरिकांनी या सामाजिक सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह नारायण भोसले विटेकर, मदनराव भोसले विटेकर, भागवतराव भोसले विटेकर, आबासाहेब भोसले विटेकर आणि ॲड.श्रीकांत भोसले विटेकर यांनी केले आहे.
जिल्हाभर कार्यक्रमाची चर्चा!
विटेकर परिवाराचा जिल्ह्यात सर्वत्र दांडगा जनसंपर्क आहे. तसेच राजकीय वलय आहे. माजी आमदार वै.उत्तमराव विटेकर यांच्या निधनामुळे त्यांचे थोरले सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या खांद्यावर जबाबदारी आली. पुढे त्यांनीही वडीलांची शिकवण आणि संस्कार केंद्रबिंदू ठेवून राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख व उंची गाठली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याची प्रचिती गेल्या लोकसभा निवडणुकीत आली आहे. त्यामुळे कार्यक्रम जरी
पुण्यस्मरण व पुरस्कार वितरण सोहळा असला तरी तब्बल ५० हजार निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या आहेत. परिणामी, जिल्ह्यात सर्वत्र कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे.