राजेश विटेकरांचे सत्कार सोहळे स्वीकारत पालकमंत्री उद्या डीपीडीसीत, हॉटेलमध्ये नेत्यांची स्पेशल बैठक
पालकमंत्री बनसोडे परभणीत.
परभणी/
पालकमंत्री पदाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच श्री. संजय बनसोडे हे सोमवारी (दि.8) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठका, भेटीगाठी असे त्यांच्या संपूर्ण दिवसभराच्या दौऱ्याचे स्वरूप आहे.
परभणी जिल्ह्यात प्रवेश करतानाच परळी- गंगाखेड रस्त्यावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे श्री. बनसोडे यांचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर परभणी शहरातही श्री. बनसोडे यांचे स्वागत व सत्कार होईल व त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नियोजन समितीच्या बैठकीस दुपारी बारा वाजता हजेरी लावतील. या बैठकीनंतर दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक औद्योगिक वसाहतीतील हॉटेल फन पार्क या ठिकाणी होणार आहे. या बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परभणी दौरा गुरुवारी (दि.11) या दिवशी होणार असल्याने या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित स्थळाची ते पाहणी करणार आहेत. पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन या ठिकाणची ते पाहणी करतील. पक्षाशी संबंधित सर्व कार्यक्रमांच्या नियोजनात पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांचा पुढाकार आहे. सावली विश्रामगृहावर सायंकाळी पाच वाजता महायुतीतील नेत्यांच्या भेटीही श्री. बनसोडे हे घेणार आहेत. त्यानंतर सुजाता नगरातील सुजाता बुद्ध विहार या ठिकाणी ते भेट देणार आहेत. हे सर्व कार्यक्रम आटोपून रात्री देवगिरी एक्सप्रेसने पालकमंत्री श्री. बनसोडे हे मुंबईकडे रवाना होणार आहेत.