सेलू ते परभणी जाणाऱ्या एसटी बसमध्ये जागेच्या कारणावरून प्रवाशांचा वाद झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याची तक्रार बालासाहेब बाजीराव खिस्ते (रा. वालूर) यांनी पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ही घटना दि.९ फेब्रुवारी रोजी दुपारी ११.४५ वा घडली.
सेलू-परभणी बस (क्रमांक एम. एच २० बी.एल. २३१३) सेलूहून परभणीकडे जात असताना सेलू- मानवत रोड दरम्यान गोगलगाव पाटीजवळ या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असल्यामुळे प्रवाशांमध्ये वाद झाला. या कारणाने बसच्या वाहकाने गाडी थांबवली. त्यानंतर गाडीतील वाहक यांनी पोलिसांना बोलावले. घटनास्थळी सेलू पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल कांबळे हे आले. त्यांनी प्रवाशांची समजूत काढून प्रकरण शांत केले. त्यानंतर साध्या ड्रेसमध्ये दुसरे कॉन्स्टेबल वशिष्ठ भगवानराव भिसे हे दुचाकीवर आले आणि येताच मारहाण करण्यास सुरुवात केली आणि बालासाहेब खिस्ते यांना शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, असे निवेदनात नमूद केले आहे. त्यानंतर एका कोऱ्या कागदावर खिस्ते यांची सही घेतली आणि तू जर माझी तक्रार केली तर या सहीच्या आधारे मोठ्या गुन्हयामध्ये अडकवतो असे म्हणून भीती दाखवू लागले, असा आरोपही करण्यात आला आहे.
बालासाहेब खिस्ते यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत असे नमुद केले आहे कि, विनाकारण मारहाण करणारे पोलीस कॉन्स्टेबल वशिष्ठ भिसे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे नसता मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल.