आता तरी पत्रकारांना घरांसाठी जागा द्या,व्हाईस ऑफ मिडियाची मागणी जिल्हाधिकारी,आमदार यांना दिले निवेदन
पत्रकारांना घरांसाठी जागा द्या,व्हाईस ऑफ मिडियाची मागणी
जिल्हाधिकारी,आमदार यांना दिले निवेदन
परभणी,दि 06 ः
परभणी शहरासह तालुकास्तरावर पत्रकारांची घरे व पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी व्हाईस ऑफ मिडिया परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व आमदार डॉ.राहुल पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. यावर आमदार डॉ.राहुल पाटील व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ज्वाइंट मिटिंगला घेऊन यावर निर्णय घेऊ पत्रकारांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे अश्वासन दिले आहे.
व्हाईस ऑफ मिडिया ही पत्रकार संघटना पंचसुत्री कार्यक्रम हाती घेऊन पत्रकारीता आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून पत्रकारांचे आरोग्य, शिक्षण, घरे, पत्रकार भवन,अधिस्वीकृती यावर संघटनेचा अधिक भर आहे. व्हाईस ऑफ मिडिया परभणीच्या वतीने मागील काही दिवसापासून पत्रकारांच्या घरासाठी लढा सुरु केला आहे. त्यासाठी परभणी शहरात किमान पाच एकरचा शासकीय भुखंड शासनाने मोफत द्यावा अशी मागणी केली जात आहे. याच मागणीचे निवेदन . व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने देण्यात आले आहे. आर.पी मेडीकल कॉलेज येथे पार पडलेल्या आरोग्य शिबीरात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व आमदार डॉ.राहुल पाटील हे आले असता त्यांना पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यामध्ये परभणी जिल्ह्यातील अनेक पत्रकारांना स्वतःची हक्काची घरे नाहीत. त्यांना हक्काचे घर देण्यासाठी शासनाने जागा आणि गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून मोफत घर द्यावीत. जिल्हा परिषद आणि सर्व कृषि विद्यापीठे येथे जनसंपर्क अधिकारी पदासाठी पत्रकारिता पदविधारकांचीच नेमणूक करावी. प्रत्येक शहरात पत्रकारांसाठी हक्काचे पत्रकार भवन असावे यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सरसकट पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबासाठी आरोग्य पत्रिका उपलब्ध करून द्यावे, ज्येष्ठ पत्रकारांसाठी असलेल्या सन्मान निधी योजनेच्या अटी आणि शर्ती शिथिल कराव्यात,केंद्रीय विद्यालयात पत्रकारांच्या पाल्यांना स्वतंत्र कोट्यातून प्रवेश देण्यात यावा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, महानगरपालिका, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे पत्रकारांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी,अधिस्वीकृती धारक पत्रकारांना रातराणी,शिवनेरी स्लीपर बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा करावी. अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे राज्य कार्यवाह सूरज कदम, मराठावाडा अध्यक्ष विजय चोरडिया,जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख,कार्याध्यक्ष कैलास चव्हाण ,प्रविण चौधरी,विशाल माने, बालासाहेब काळे,प्रदिप कांबळे,गणेश पाटील,गणेश रेंगे,गणेश लोखंडे,नेमीनाथ जैन,भास्कर लांडे,दिलीप बोरुळ आदी उपस्थित होते.