विनोद बोराडे ‘दादां’च्या राष्ट्रवादीच्या मार्गावर
गुरुवारी मुंबईत अजितदादांची भेट
परभणी
हनुमंत चिटणीस
नगरपालिकेवर वर्षानूवर्षापासून निर्विवाद वर्चस्व राखणारे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून बोराडे हे बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ महायुतीतील घटक पक्ष असणार्या राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाच्या संपर्कात होते. विशेषतः एक-दोन बैठकीतून बोराडे यांनी दादांबरोबर हितगूजही केले. त्यानंतर समर्थकांबरोबर चर्चा करीत आगामी निवडणूका, त्याअनुषंगाने समीकरणे ओळखून दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा जवळपास निर्णयही केला. त्यापाठोपाठ ते ‘दादां’च्या भेटीच्या प्रतिक्षेत होते. गुरुवारी बोराडे व समर्थकांना मुंबईत वेळ दिला जाणार असून त्या भेटीतच बोराडे व समर्थकांचा राष्ट्रवादीच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष बोराडे यांनी बोलतांना आपण समर्थकांसह गुरुवारी मुंबईत अजित दादा यांची भेट घेणार आहोत, असे स्पष्ट केले. व राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेशाबाबतही सुतोवाच केले आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघांतर्गत जिंतूर व सेलू या दोन मोठ्या भागात राष्ट्रवादीच्या अजित दादा यांच्या गटाचा एखादाही बडा नेता नाही, ही मोठी पोकळी ओळखून तसेच आगामी राजकीय समिकरणे, गणिते ओळखून स्वहितासाठीच बोराडे यांनी अजित दादा यांच्या समर्थनाचा निर्णय घेतला असावा, असा होरा राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.