शिवपुराण कथेला जनसागराच्या उपस्थितीत जोरदार प्रारंभ, पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे गौरवोद्गार परभणीकर भाग्यशाली
प्रयागराजचा ‘कुंभ’ परभणीत अवतरला;
प.पू. पंडीत श्री प्रदीपजी मिश्रा यांचे गौरवोद्गार : परभणीकर भाग्यशाली
परभणी,
: पौष महिना अन् मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावरच पाच दिवशीय शिवपुराण कथा श्रवणाचा दुर्मिळ योग यावा हे परभणीकरांचे भाग्य आहे, असे उद्गार प.पू. पंडीत प्रदीपजी महाराज मिश्रा यांनी शुक्रवारी (दि.13) शिवपुराण कथा सोहळ्याच्या प्रारंभी व्यक्त केले. अन् मंडप व मंडपाबाहेरील लाखो भाविकांच्या उपस्थितीची दखल घेवून या पावनभूमीत आज प्रयागराजचा ‘कुंभ’ अवतरला आहे, असे गौरवोद्गारही काढले.
पाथरी महामार्गावरील लक्ष्मी नगरीमध्ये शुक्रवारपासून शिवपुराण कथा सोहळ्यास प्रारंभ झाला. सायंकाळी 4.30 वाजता प.पू. पंडीत श्री प्रदीपजी मिश्रा यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यावेळी भव्यदिव्य अशा मंडपातील व मंडपाबाहेर आसनस्थ भाविकांनी टाळ्यांचा एकच गजर केला. ‘हरहर महादेव’, ‘शिवशंभो’ या गजराने लक्ष्मी नगरीसह आसमान अक्षरशः दुमदुमून गेले.
या सोहळ्याचे आयोजक खासदार संजय जाधव, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. क्रांती जाधव यांनी शिवशंकर पार्वतीच्या मुर्तीचे पुजन केले. तसेच प.पू.पंडीत मिश्राजी महाराज यांचे यथोचित स्वागत केले. याप्रसंगी पं.पू.पंडीत मिश्राजी महाराज यांनी खासदार जाधव यांच्यासह यजमान परभणीकरांचे मुक्तकंठाने कौतूक केले. शिवपुराण कथेकरीता सर्व ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर आमंत्रणे आहेत. परंतु, 2025 अखेरपर्यंत निमंत्रणे स्विकारता येणार नाहीत, असे चित्र आहे. असे असतांनासुध्दा परभणीकरांचे भाग्य काय असावे, कानपूर ऐवजी परभणीकरांना कथा सोहळ्याची संधी मिळावी. खरेतर आपल्यावर ही हरी विठ्ठलाचीच कृपा आहे. खासदार जाधव यांचे हरी विठ्ठल प्रेमाचे हे द्योतक आहे, असे नमूद करीत प.पू. पंडीत मिश्राजी महाराज यांनी परभणीकर खरोखरच भाग्यशाली आहेत. पाच दिवशीय शिवपुराण कथेचा योग, तोसुध्दा पौष महिन्यात व मकरसंक्रांतीच्या काळात यावा, यासारखा दुर्मिळ योग कोणता, असे ते म्हणाले.
कथा सोहळा निश्चित झाल्यानंतर तयारीकरीता अवघे आठ दिवसच शिल्लक होते. हे काम मुश्किल आहे, असे वाटत होते. परंतु, परभणीचे लोक खूप जागरुक आहेत. ते निश्चितच कथा सोहळ्याच्या व्यवस्थेची कामे निश्चितच युध्द पातळीवर पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त होत होता. परभणीकरांनी तो विश्वास सार्थ ठरवला आहे, असे ते म्हणाले. श्री शंकराची भक्ती, शिवप्रेम हेच त्यामागचे वास्तव आहे, असे ते म्हणाले. या कथा सोहळ्याकरीता मंडपासह मंडपाबाहेरच्या भाविकांची अलोट गर्दी म्हणजे आज परभणीत प्रयागराजचा ‘कुंभ’च अवतरला, असे गौरवोद्गारही मिश्राजी महाराज यांनी काढले.
दरम्यान, या कथासोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ नेते माजी आमदार सितारामजी घनदाट यांच्यासह शेकडो मान्यवर व लाखोंच्या संख्येने भाविकांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावली. कथा सोहळा 4 वाजता सुरु होणार, त्यापूर्वीच 3 वाजताच मुख्य मंडप भाविकांच्या उसळलेल्या गर्दीने खचाखच भरला. तर मंडपाबाहेरसुध्दा जागा मिळेल त्या ठिकाणी भाविकांनी आसनस्थ होवून शिवपुराण कथा श्रवणाचा आनंद लूटला.