महाराष्ट्रमुख्य बातमी

मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी सुट्टी घेऊन गावी निघून गेले?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ही सगळी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्याला त्यांच्या गावी निघून गेल्याची आणखी एक वदंता राजकीय वर्तुळात पसरली आहे. भाजपकडून पडद्यामागून अजित पवार यांच्याशी सुरु असलेल्या वाटाघाटी आणि मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली या बातम्यांमुळे एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी तीन दिवसांसाठी साताऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला, अशी कुजबूज सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला आहे.

उदय सामंत हे मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन गावाला निघून गेले आहेत का, असे विचारण्यात आले. त्यावर उदय सामंत यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे असं कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे”, असे उदय सामंत यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे खरंच नाराज होऊन गावाला निघून गेले का?

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा केला होता. भाजपला मविआचे सरकार पाडायचे होते. त्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर झाला, ते काम पूर्ण झाले आहे. पण राजकीयदृष्ट्या भाजपला महाराष्ट्रात ताकद देण्यात हे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावरुन राजकीय वर्तुळात बराच गदारोळ झाला होता. ही सगळी चर्चा सुरु असताना एकनाथ शिंदे हे आश्चर्यकारकरित्या तीन दिवसांची सुट्टी घेऊन साताऱ्यातील त्यांच्या गावी निघून गेले. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे तीन दिवसांसाठी गावी जाणार, असा कोणताही कार्यक्रम ठरला नव्हता. परंतु, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावी जात असल्याचा संदेश पाठवला. एकनाथ शिंदे हे २४ ते २६ एप्रिल हे तीन दिवस गावी असणार आहेत. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व कार्यक्रम रद्द करून गावाला निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

भाजप पडद्यामागून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी ज्याप्रकारे चर्चा करत आहे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारसे पसंत नाही. भाजपच्या ठरवलेल्या अजेंड्यानुसार आणि रणनीतीनुसार सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना भाजपकडून पडद्यामागे अजित पवार यांना हाताशी धरून वेगळ्या राजकीय समीकरणांची आखणी सुरु आहे. या टप्प्यावर अशा काही राजकीय घडामोडी घडतील, याची अपेक्षा एकनाथ शिंदे यांना नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन तीन दिवसांसाठी गावी निघून गेल्याचे वृत्त आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button