निवडणुकीच्या रणांगणातला ‘डेटाचा साधू’ – परभणी चा अभिजीत ब्रह्मनाथकर !
प्रशांत जोशी यांचे थेट बंगाल मधून निरीक्षण

कोलकाता / परभणी:
परभणीत जन्म, परभणीतच शिक्षण घेवून पत्रकारितेत नाव कमावलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अभिजित ब्रह्मनाथकर ! नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट लोकांमध्ये मिसळत या निवडणुकीचे अचूक अंदाज वर्तवले. त्यांच्या या बंगाल प्रवासात मुळ पत्रकार आणि सध्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत जोशी कांही दिवस सोबत होते. निवडणूक काळातील ब्रह्मनाथकर यांची कार्यपद्धती आणि त्यांचा अभ्यास यावर प्रशांत जोशी यांनी टाकलेला दृष्टीक्षेप त्यांच्याच शब्दांत, खास परभणीकरांसाठी !

अभिजीत ब्रम्हनाथकर हे नाव दिल्ली आणि मुंबईच्या माध्यमविश्वात तसे नवीन नाही. विशेषतः दिल्लीतील मीडिया आणि राजकीय वर्तुळात ते चांगलेच ओळखीचे आहेत. परभणीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन थेट दिल्लीत पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरलेल्या या तरुणाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विविध वृत्तवाहिन्यांसाठी काम करताना देशभरातील निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी अक्षरशः भारत पिंजून काढला. या प्रवासातून पत्रकारिता तर झालीच, पण त्याचबरोबर निवडणूक विश्लेषण, मतदारांच्या मानसिकतेचा अभ्यास आणि विविध राज्यांच्या संस्कृतींची ओळख याची त्यांना एक वेगळीच गोडी लागली—जी पुढे त्यांची ‘पॅशन’ बनली.
दिल्लीतील पत्रकारिता संपवून ते मुंबईत आले. मात्र इथल्या पत्रकारितेत ते फारसे रुळले नाहीत. त्यांनी आपल्या शिक्षणाच्या मूळ वाटेकडे वळत वकिलीचा मार्ग स्वीकारला आणि मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. पण पत्रकारितेचा पिंड आणि निवडणुकांचा अभ्यास—हे दोन्ही त्यांच्यात इतके खोलवर रुजलेले होते, की त्या जगापासून दूर राहणे त्यांच्यासाठी अशक्यच होते. वकिली करतानाच त्यांनी निवडणूक विश्लेषण, अंदाज (एक्झिट पोल) आणि राजकीय घडामोडींचा अभ्यास कायम ठेवला.

साधारण आठ-दहा वर्षांपूर्वी एका आमदारांच्या निमित्ताने आमची ओळख झाली. गोड स्वभाव आणि माणसं जोडण्याची कला या दोघांतही समान असल्यामुळे पहिल्याच भेटीत मैत्री झाली. पुढे भेटी वाढल्या, गप्पा वाढल्या आणि प्रत्येक भेटीत त्यांच्या कामाची खोली समजत गेली. देशभरातील निवडणुका, त्यांचे ट्रेंड्स, मतदारसंघांची नाडी—याबद्दल ते इतक्या आत्मविश्वासाने बोलत असत, की अनेकदा त्यांच्या अंदाजांच्या अचूकतेच्या गोष्टी ऐकून मनात एक वेगळंच कुतूहल निर्माण व्हायचं.
आपण एखाद्या मतदारसंघात काम करत असलो, तरी निकाल लागेपर्यंत खात्री नसते… आणि दुसरीकडे अभिजीतसारखा माणूस संपूर्ण राज्याचा अभ्यास करून ५–१० टक्क्यांच्या फरकात अचूक अंदाज कसा देतो?
याच कुतूहलातून एक इच्छा मनात होती—कधीतरी या माणसासोबत एखाद्या निवडणुकीच्या राज्यात जाऊन त्याचा ‘अभ्यास’ प्रत्यक्ष पाहायचा.
आणि सुदैवाने, पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने ती संधी मिळाली.
मुंबई विमानतळावर आमची भेट झाली आणि प्रवास सुरू झाला. अंगात बंडीप्रमाणे शर्ट, गळ्यात जुन्या काळातील पत्रकारांची शबनम बॅग, त्यात कागदांचे भले मोठे गठ्ठे, खुरटी दाढी—पहिल्याच नजरेत हा माणूस पत्रकार आहे हे स्पष्ट दिसत होतं. पुढील काही दिवस आम्ही त्याच्यासोबत राहणार होतो—तो बंगालचा अभ्यास करणार होता, आणि आम्ही त्याचा!
विमानातच त्याचा ‘फिल्डवर्क’ सुरू झाला. बाजूला बसलेल्या एका बंगाली प्रवाशाशी गप्पा सुरू झाल्या आणि काही मिनिटांतच विषय निवडणुकीवर गेला. अभिजीतने आपल्या शबनममधून कागदांचे गठ्ठे काढले, आकडे मांडले आणि समोरच्याला पटवून सांगायला सुरुवात केली. तिथून पुढे टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेलमधील वेटर, झालमुडी विक्रेता, काली मंदिरातील दर्शन रांगेतील भाविक—जो कोणी भेटेल त्याच्याशी तो संवाद साधायचा, त्याला बोलत करायचा आणि त्यातून माहिती काढायचा.
मी म्हणायचो कीती बोलता, त्याचा एक ठाम सिद्धांत—“समोरचा माणूस खुला व्हायचा असेल, तर आपण आधी खुलं व्हायला हवं.”
सकाळी लवकर उठून आकडेमोड, कागदपत्रांचा अभ्यास, टीमसोबत दीर्घ चर्चा, फोनवर तासन्तास संवाद—त्याचा दिवस असाच सुरू असायचा. मध्येच lalantop सारख्या अनेक you tube चॅनल, वाहिन्याला अभ्यासक म्हणून बाईट
द्यायचा, चर्चेत सहभागी होत असे अन आम्हाला कॅमेरामन ची भूमिका पार पाडावी लागत असे.
आम्ही बंगाल फिरायला आलो होतो, पण तो मात्र पूर्णपणे आपल्या ‘डेटाच्या दुनियेत’ रमलेला होता. रात्री दिल्ली मीडियातील पत्रकारांसोबतच्या गाठीभेटीतून तो ‘इनसाईड’ माहिती गोळा करायचा. विशेष म्हणजे, त्याच्या अचूक अंदाजांमुळे समोरच्यांनाही त्याच्याबद्दल आदरभाव होता—ते त्याच्याकडे माहिती देत आणि त्याचाच अंदाज विचारत.
या सगळ्यात एक वेगळाच अनुभव म्हणजे—राजकीय पक्षांच्या कार्यालयांना दिलेल्या भेटी.
आम्ही भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या दोन्ही पक्षांच्या कार्यालयात गेलो. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कार्यालयं जवळपास ओस पडलेली—नेते, कार्यकर्ते सगळेच फिल्डवर. पण त्या रिकाम्या कार्यालयातही अभिजीत बराच वेळ बसायचा. जणू काही त्या भिंती, पोस्टर्स आणि वातावरण त्याच्याशी संवाद साधत आहेत, असं वाटायचं.
ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला. ती प्रत्यक्षात झाली नाही, पण त्या प्रयत्नातून बंगालच्या राजकारणाची नाडी जवळून जाणवली. मात्र त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आणि भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सुरेंद्र अधिकारी यांची आम्हाला एका कॉर्नर मीटिंगमध्ये भेट झाली. त्या भेटीतून आणि त्यांच्या टीममधील लोकांशी झालेल्या चर्चेतून भाजपचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता.

एक संध्याकाळ अशीच त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या एका प्रमुख व्यक्तीने आम्हाला चहासाठी बोलावलं. निवांत गप्पांमध्ये त्यांनी “आम्ही बंगाल जिंकत आहोत” ही कथा इतक्या आत्मविश्वासाने सांगितली, की शेवटी त्यांनी थेट आमंत्रण दिलं—“मुख्यमंत्री शपथविधीला नक्की या!”
हे सगळे लोक अभिजीतचे ‘इनसाईड’ सर्कल होते. निवडणुकीच्या आतल्या गोटातील माहिती ते त्याच्याशी अगदी मोकळेपणाने शेअर करत होते—इतका त्याचा संपर्क आणि विश्वास.
पश्चिम बंगालमधील २९४ मतदारसंघांची नावे, त्यांची भौगोलिक विभागणी, स्थानिक प्रभाव, राजकीय समीकरणे—हे सगळं त्याला अक्षरशः मुखोद्गत होतं. कधी कधी तो महाराष्ट्राचा पत्रकार आहे की बंगालचा, असा प्रश्न पडावा इतकी त्याची पकड होती.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—त्याने आपला अंदाज कधीच लपवला नाही.
पहिल्या दिवसापासून तो ठाम होता—“बंगालमध्ये सत्तांतर होणार आणि भाजप येणार.”
दिवसागणिक त्याच्या आकड्यांमध्ये वाढ होत गेली. आम्ही विनोदाने म्हणायचो—“३०० जागा देऊ नकोस!”
पण तो तितक्याच खात्रीने म्हणायचा—“निकाल बघा!”
आणि शेवटी… निकालाच्या दिवशी त्याचे अंदाज जवळपास तंतोतंत खरे ठरले.
लहानपणी आपण प्रणय रॉय, विनोद दुआ, योगेंद्र यादव, राजदीप सरदेसाई यांचं विश्लेषण ऐकत मोठे झालो. आजच्या पिढीत अभिजीतसारखी माणसं डेटा, अभ्यास, तटस्थता आणि प्रामाणिकपणावर आधारलेलं विश्लेषण करताना दिसतात—तेव्हा एक गोष्ट पटते…
वाद कितीही झाले, एक्झिट पोलवर प्रश्नचिन्हं कितीही उभी राहिली…
तरीही हे काम प्रामाणिकपणे करणारी, अभ्यासू आणि जमिनीवर उतरून काम करणारी माणसं आजही आहेत.
अभिजीत ब्रम्हनाथकर हे फक्त एक नाव नाही—
ते निवडणुकीकडे पाहण्याची एक वेगळी, शास्त्रीय आणि प्रामाणिक दृष्टी आहे.

