जगात जर्मनीपरभणीमहाराष्ट्र

विरोधकांचा चक्रव्यूह भेदून मेघना बोर्डीकर ठरल्या ‘बाजीगर !’

परभणी जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा !

परभणी : शेवटच्या दिवसापर्यंत सस्पेंस बनून राहिलेल्या परभणी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले. विरोधकांसह सोबत्यांनीही आखलेला मजबूत राजकीय चक्रव्यूह भेदून जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यात पालकमंत्री मेघना बोर्डिकर यांना यश आले आहे. यामुळे पुन्हा एकदा परभणी जिल्ह्याच्या राजकारणातील ‘बाजीगर’ बोर्डिकर ह्याच ठरल्या आहेत.

सर्वाधिक २४ जागा जिंकून परभणी जिल्हा परिषदेत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. निवडणूक निकालादिवशीच पालकमंत्री मेघना बोर्डिकर यांनी शिवसेना ( शिंदे ) यांना सोबत घेवून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची घोषणा केली. या घोषनेनंतर विरोधकांनी एकत्र येत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदच शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याचे निश्चित करून राष्ट्रवादी ( अजित पवार ), शिवसेना ( ठाकरे ), कॉंग्रेस व अपक्ष अशी मोट बांधण्याचा जोरदार प्रयत्न केला. यात हे पक्ष बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. काही सदस्य सहलीवर रवानाही झाले होते. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपा सत्तेपासून दूर राहणार, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मोठ्या पराभवास सामोरे जावे लागणार अशा बातम्या येत होत्या.

हे होत असतानाच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावले. वरीष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी विचारविनिमय करत एक पाऊल मागे येण्याचीही तयारी केली. या राजकीय वाटाघाटीत त्यांना नको असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता सोबतही मान्य केली. यामुळे एका राजकीय संघर्षाचा शेवट परभणी जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपाचा अध्यक्ष होण्याने झाला. आज झालेल्या बिनविरोध निवडीत अध्यक्षपदी सौ. लता विजय वाकळे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ॲड. श्रीकांत विटेकर यांची निवड करण्यात आली आहे.

*ऐतिहासिक दिवस – पालकमंत्री बोर्डिकर*
भाजपा कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असा आहे. सौ. लता वाकळे यांच्या निवडीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यास न्याय मिळाला आहे. जिल्हा परिषदेवर फडकणारा भारतीय जनता पार्टीचा झेंडा पाहून गेली अनेक वर्षे पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. जिल्हा परिषदेची ही सत्ता शेवटच्या घटकाची सेवा करण्यासाठी नवा परभणी जिल्हा घडवण्यासाठी वापरण्याचा मनोदय पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला. राज्यस्तरावरील महायुतीच्या धर्तीवर सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला वरीष्ठ पातळीवर ठरला. मी पक्षादेश मानणारी कार्यकर्ता आहे. पक्षाचा हा आदेश मान्य करत राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्याचे स्पष्टीकरण विजयी मेळाव्याला संबोधित करताना पालकमंत्री बोर्डिकर यांनी दिले.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button